भारताच्या खात्यात दोन कांस्यपदकांची भर
By Admin | Updated: September 23, 2014 06:08 IST2014-09-23T06:08:17+5:302014-09-23T06:08:17+5:30
सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल यांनी स्क्वॅश कोर्टवर आज, सोमवारी इतिहास रचला, तर नेमबाजांनी पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली

भारताच्या खात्यात दोन कांस्यपदकांची भर
इंचियोन : सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल यांनी स्क्वॅश कोर्टवर आज, सोमवारी इतिहास रचला, तर नेमबाजांनी पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली. १७ व्या आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताला आपल्या खात्यात दोन कांस्यपदकांची भर घालण्यात यश आले. वुशू स्पर्धेत थोडम सनातोई देवी व नरेंद्र ग्रेवाल या भारतीय स्पर्धकांनी आपापल्या गटात उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले.
घोषाल स्क्वॅशच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. घोषालचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. पल्लिकलला उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या निकोल डेव्हिडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकाविणारी ती पहिली भारतीय महिला स्क्वॅशपटू ठरली आहे.
नेमबाजीमध्ये भारतीय पथकाने पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली आहे. महिला विभागात २५ मीटर पिस्तूल नेमबाजीमध्ये राही सरनोबत, अनिस सय्यद व हिना सिद्धू यांचा समावेश असलेल्या संघाने कांस्यपदकाचा मान मिळविला.
महिला पिस्तूल संघ, स्क्वॅशपटू घोषाल व पल्लिकल आणि महिला हॉकी संघाचा अपवाद वगळता अन्य क्रीडा प्रकारांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंनी निराशा केली. पुरुष फुटबॉल संघ आणि टेनिस संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
सोमवारी दोन पदकांची कमाई करणारा भारत पदकतालिकेत १३ व्या स्थानी आहे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण व पाच कांस्यपदकांची नोंद आहे. १७ सुवर्णपदकांसह एकूण ४१ पदकांची कमाई करणारा चीन अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया (१३ सुवर्णपदकांसह एकूण १५ पदके) आणि जपान (७ सुवर्णपदकांसह एकूण २८ पदके) यांचा क्रमांक आहे.
सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी कायम आहे. अमरजित सिंग नागी व अमृत सिंग यांना पुरुषांच्या स्प्रिंट पात्रता फेरीत अनुक्रमे १३ व १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय जलतरणपटू संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्राथपन नायर याला पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविता आली नाही. (वृत्तसंस्था)