भारतीय फुटबॉल संघाचा बलाढय इटलीवर 2-0 ने विजय
By Admin | Updated: May 20, 2017 12:00 IST2017-05-20T11:55:52+5:302017-05-20T12:00:36+5:30
भारताच्या अंडर -17 फुटबॉल संघाने शुक्रवारी मैत्रीपूर्ण सामन्यात बलाढय इटलीवर 2-0 असा विजय मिळवला.

भारतीय फुटबॉल संघाचा बलाढय इटलीवर 2-0 ने विजय
ऑनलाइन लोकमत
अॅरीझो, दि. 20 - भारताच्या अंडर -17 फुटबॉल संघाने शुक्रवारी मैत्रीपूर्ण सामन्यात बलाढय इटलीवर 2-0 असा विजय मिळवला. फुटबॉलच्या इतिहासात भारतीय संघाने प्रथमच अशी कामगिरी केली आहे. वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी भारताचा अंडर-17 संघ सध्या युरोप दौ-यावर असून, इटलीच्या अंडर-17 संघाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन करण्यात आले होते.
भारताकडून अभिजीत सरकारने 31 व्या आणि राहुल प्रवीणने 80 व्या मिनिटाला गोल केला. यावर्षी भारतामध्ये अंडर-17 फुटबॉलचा वर्ल्डकप होणार आहे. या सामन्यात भारताच्या युवा संघाने जास्तवेळ बॉल आपल्या ताब्यात ठेवला आणि गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या.
सामना सुरु झाल्यानंतर आठव्या आणि 13 व्या मिनिटाला भारताची गोल करण्याची संधी हुकली पण 31 व्या मिनिटाला अभिजीत सरकारने इटलीची बचावफळी भेदून सुंदर गोल केला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 80 व्या मिनिटाला राहुल प्रवीणने गोल करुन आघाडी 2-0 ने वाढवून शेवटपर्यंत टिकवली. या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी टि्वटकरुन भारताच्या अंडर-17 संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
Great day! #India U-17 #football team defeats #Italy 2-0 in Arezzo! Well done boys, proud of you all! pic.twitter.com/Vsn60OGlCk
— Vijay Goel (@VijayGoelBJP) May 19, 2017