भारतापुढे ‘तगडे’ आव्हान
By Admin | Updated: October 13, 2016 00:52 IST2016-10-13T00:49:25+5:302016-10-13T00:52:58+5:30
पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या भारतीय संघापुढे गुरुवारी (दि. १३) तगड्या ब्राझीलचे आव्हान असेल. पहिल्या १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने

भारतापुढे ‘तगडे’ आव्हान
पणजी : पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या भारतीय संघापुढे गुरुवारी (दि. १३) तगड्या ब्राझीलचे आव्हान असेल. पहिल्या १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने अपराजित कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे विजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या ब्राझीलचे आव्हान भारतीय संघापुढे असेल.
स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांना रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या संघांकडून पराभवाचा सामना करावा लागला. संधी मिळूनही त्याचे रूपांतर विजयात करणे भारतीय खेळाडूंना जमले नाही.
भारतीय संघाने विजयासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला टक्करही दिली. मात्र, सांघिक कामगिरीत भारतीय संघ मागे पडला आहे. या क्षेत्रात सुधारणा करून ब्राझीलविरुद्धचा औपचारिक सामना जिंकणे याच इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक निकोलई अॅडम हे दक्षिण आफ्रिका आणि रशियाविरुद्धच्या प्रदर्शनावर खुश होते. मात्र, चीनविरुद्ध भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, स्पर्धेत खेळाडूंनी एक विरोधी संघ म्हणून सिद्ध केले आहे.
आम्ही रशिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना चांगली टक्कर दिली. संधीचा फायदा उठवता आला असता तर निकाल काही वेगळा असता. खेळाडूंच्या कामगिरीत बऱ्याच सुधारणा झाल्या असून ते चांगले संकेत आहेत.
गेल्या चीनविरुद्धच्या सामन्यात संघातील प्रमुख खेळाडू अपयशी ठरले होते. आम्ही या सामन्यात दबदबा निर्माण केला होता. हा सामना आम्हीच जिंकायला हवा होता. मात्र, आम्ही संधीचा फायदा उठवू शकलो नाही. अतिम क्षणी झालेल्या गोलने आमच्या आशेला धक्का दिला. उद्याच्या सामन्यासाठी संघ सज्ज असून आम्ही विजयाचा प्रयत्न करणार आहोत.