भारताचा लाजिरवाणा पराभव

By Admin | Updated: October 9, 2014 03:45 IST2014-10-09T03:45:00+5:302014-10-09T03:45:00+5:30

वेस्ट इंडिजने उभ्या केलेल्या ३२१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज अवघ्या १९७ धावांत ढेपाळले.

India's shameful defeat | भारताचा लाजिरवाणा पराभव

भारताचा लाजिरवाणा पराभव

कोच्ची : वेस्ट इंडिजने उभ्या केलेल्या ३२१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज अवघ्या १९७ धावांत ढेपाळले. पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांचे अपयश यजमानांसाठी डोकेदुखी ठरले. विंडीजने हा सामना १२४ धावांनी जिंकला. मार्लोन सॅम्युअल्स याच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
आयपीएलमुळे भारतीय खेळपट्टीची अचूक जाण असलेल्या कॅरेबियन खेळाडूंनी यजमानांच्या गोलंदाजांची यथेच्च धुलाई केली. ड्वॅन स्मिथ (४६), मार्लोन सॅम्युअल्स (१२६*) आणि दिनेश रामदिन (६१) या त्रिकुटाने कोच्चीच्या नेहरू स्टेडियमवर कॅरेबियन वादळ निर्माण केले आणि भारतासमोर ३२१ धावांचे खडतर आव्हान उभे केले. सॅम्युअल्सने खास विंडिज स्टाईलची फटकेबाजी करून कारकिर्दीतले सहावे शतक पूर्ण केले. २०१५च्या वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने संघ बांधणीसाठी महत्त्वाच्या या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघाची हाराकिरी झाली. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीवीरांना ताळमेळ राखता न आल्याने आवघ्या ४९ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. या धक्क्यातून सावरण्याआधीच विंडीजने यजमानांना हादरे देण्यास सुरुवात केली. भारताच्या सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडा पार करू दिला नाही. ४ बाद ८३ धावा अशा दयनीय अवस्थेत असताना धवन आणि महेंद्रसिंग धोनी ही जोडी करिष्मा करेल अशी आशाही फोल ठरली. ३३ धावांवर धोनी आणि ६८ धावांवर धवन माघारी परतल्यानंतर पुन्हा गळती सुरू झाली. भारताचा संपूर्ण डाव ४१ षटकांत १९७ धावांवर गडगडला. (वृत्तसंस्था)

Web Title: India's shameful defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.