भारताचा सलग दुसरा पराभव
By Admin | Updated: December 8, 2014 01:04 IST2014-12-08T01:04:26+5:302014-12-08T01:04:26+5:30
दोनदा घेतलेली आघाडी गमाविणाऱ्या यजमान भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला

भारताचा सलग दुसरा पराभव
भुवनेश्वर : दोनदा घेतलेली आघाडी गमाविणाऱ्या यजमान भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. अर्जेन्टिनाने भारताचा ४-२ ने पराभव केला. भारताचा बचाव कमकुवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोनदा मिळविलेली आघाडी भारताला मिनिटभरही कायम राखता आली नाही. कलिंगा स्टेडियममध्ये उपस्थित ७ हजार प्रेक्षकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. भारतातर्फे आकाशदीप सिंग (३० वा मिनिट) व गुरजिंदर सिंग (३७ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला तर अर्जेन्टिनातर्फे लुकास विला (३० वा मिनिट), जुआन लोपेझ (३७ वा मिनिट) गस्टिन माजिली (४९ वा मिनिट) आणि जोकिन मेनिनी (५९ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारताच्या आघाडीच्या फळीने गोल नोंदविण्याच्या संधी निर्माण केल्या, पण बचाव फळीने अर्जेन्टिना संघाला आक्रमक चाली रचण्याच्या संधी प्रदान केल्या. यापूर्वी, शनिवारी आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनी संघाने अखेरच्या क्षणी गोल नोंदवित भारताचा पराभव केला होता. भारताला आता मंगळवारी साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत नेदरलँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीच्या निकालानंतर उपांत्यपूर्व फेरीतील प्रतिस्पर्धी संघ निश्चित होईल. अर्जेन्टिना संघाची मंगळवारी जर्मनीसोबत लढत होईल.
आज खेळल्या गेलेल्या लढतीत पहिल्या क्वार्टरमध्ये गोलफलक कोराच होता. भारताला आठव्या मिनिटाला गोल नोंदविण्याची संधी होती, पण निकिन थिमैया व ललित उपाध्याय यांनी चांगली चाल रचली, पण फिनिशिंग योग्य नसल्यामुळे गोल नोंदविता आला नाही. (वृत्तसंस्था)