भारताचे रुत्विका, सिरील, प्रणव-सिक्की उपांत्य फेरीत
By Admin | Updated: October 8, 2016 03:39 IST2016-10-08T03:39:17+5:302016-10-08T03:39:17+5:30
प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळविताना आज येथे रशियन ओपन ग्रांप्री स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली.

भारताचे रुत्विका, सिरील, प्रणव-सिक्की उपांत्य फेरीत
व्लादिवोस्तोक (रशिया) : भारतीय बॅडमिंटनपटू रुत्विका, शिवानी गाडे आणि सिरील वर्मा यांनी प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळविताना आज येथे रशियन ओपन ग्रांप्री स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली.
चौथ्या मानांकित रुत्विकाने ५२ मिनिटे रंगलेल्या लढतीत स्थानिक खेळाडू अॅलेना कोमेनद्रोवस्काजा हिला १३-२१, २१-१०, २१-१७ असे पराभूत केले. सॅफ स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या १८ वर्षीय रुत्विकाची पुढील फेरीतील लढत द्वितीय मानांकित सेनिया पोलिकारपोव्हाविरुद्ध होईल.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपची फायनल गाठणाऱ्या सिरीलने पुरुष एकेरीत मलेशियाच्या आठव्या मानांकित जुलहेल्मी जुलकिफकली याचा ३६ मिनिटांत २१-१२, २१-१८ असा पराभव केला. सिरील पुढील फेरीत रशियाच्या अनातोली यार्त्सेव्हविरुद्ध दोन हात करील.
गेल्या महिन्यात ब्राझील ओपनचे विजेतेपद पटकावणारे एन. सिक्की रेड्डी आणि प्रणव जैरी चोपडा यांनी अलेक्सांद्र वासिलकीन आणि ख्रिस्तिना विरविच या रशियन जोडीचा २१-१०, २१-८ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. भारताची ही द्वितीय मानांकित जोडी पुढील फेरीत अनातोली यार्त्सेव आणि येवगेनिया कोसेत्साकया या रशियन जोडीविरुद्ध दोन हात करील.(वृत्तसंस्था)