भारताची मदार फिरकीवर

By Admin | Updated: November 5, 2015 02:35 IST2015-11-05T02:35:08+5:302015-11-05T02:35:08+5:30

टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर उद्या (गुरुवार)पासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात फिरकीच्या जाळ्यात ओढून दक्षि

India's revolting spin | भारताची मदार फिरकीवर

भारताची मदार फिरकीवर

मोहाली : टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर उद्या (गुरुवार)पासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात फिरकीच्या जाळ्यात ओढून दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखविण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.
या मालिकेत भारताला घरच्या खेळपट्ट्यांचा कुठलाही लाभ आतापर्यंत तरी झालेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या अनुपस्थितीत खेळेल. ईशांतला लंकेविरुद्ध केलेल्या वर्तनामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. भारताची मुख्य भिस्त फिरकीवरच राहील. रवींद्र जडेजाच्या पुनरागमनानंतर विराट तीन फिरकी गोलंदाजांसह उतरू शकतो. आॅफस्पिनर आर. आश्विनदेखील ‘फिट’ आहे. लंकेविरुद्धच्या मालिकेत २० बळी घेणारा आश्विन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरू शकतो. फलंदाजीत भारताकडे शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा तसेच रोहित शर्मा आहेत.
द. आफ्रिकेची चिंता मात्र आमलाचा खराब फॉर्म हीच आहे. डिव्हिलियर्स, डीन एल्गर, स्टीव्हन वान झिल, फाफ डुप्लेसिस हे दमदार फलंदाज आहेत. ड्युमिनीची जागा घेणारा तेंबा वाबुमा हादेखील उपयुक्त ठरू शकतो. गोलंदाजीची जबाबदारी डेल स्टेन, मोर्नी मोर्केल हे वेगवान तसेच इम्रान ताहीर, सिमोन हार्पर आणि डेन पिट या फिरकी गोलंदाजावर असेल. (वृत्तसंस्था)

हेड टू हेड
भारत आणि द. आफ्रिका या दोन्ही संघांदरम्यान (१९९२-२०१३) आत्तापर्यंत एकूण २९ कसोटी सामने झाले आहेत. यात भारताने ७ तर द. आफ्रिकेने १३ सामन्यांमध्ये विजय नोंदविला आहे. ९ सामने अनिर्णित राहिले आहेत.

मोहाली येथे हे दोन्ही संघ एकमेकांसमोर प्रथमच कसोटी खेळणार आहेत.
भारताने द. आफ्रिकाविरुद्ध कोलकाता येथे ६ बाद (६४३) ही सर्वाेच्च धावसंख्या नोंदविली आहे.
द. आफ्रिकेने सेन्चुरियन येथे ४ बाद ६२० (घोषित)ही सर्वाेच्च धावसंख्या नोंदविली.

उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरोन.

दक्षिण आफ्रिका : हाशीम आमला (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, तेंबा बावुमा, जेपी ड्युमिनी, फाफ डु प्लेसिस, डीन एल्गर, सिमोन हार्पर, इम्रान ताहीर, मोर्नी मोर्केल, व्हर्नोन फिलँडर, डेन पिट, कागिसो रबाडा, डेल स्टेन, स्टीव्हन वान झील, डेन विलास.

स्थळ : पीसीए मैदान मोहाली
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

आश्विन ‘ट्रम्पकार्ड’
‘‘कसोटीत फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरते. पाच फलंदाजांनी धावांची जबाबदारी स्वीकारावी तसेच चार गोलंदाजांनी सामना जिंकून देण्यासाठी मारा करावा, अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने आर. आश्विन ट्रम्पकार्ड ठरेल. मोहालीच्या खेळपट्टीवर आश्विन सामना जिंकून देऊ शकतो. गेल्या दोन -तीन वर्षांत भेदक मारा करून सामना जिंकून देण्याचा त्याला अनुभव आहे. खेळपट्टी कशी असावी, याची साधी चर्चादेखील होऊ नये. अनुकूल खेळपट्टी तयार करण्याचा यजमान संघाला अधिकार असतो. विदेशात आम्ही खेळपट्टीची कुठलीही तक्रार करीत नाही.’’
- विराट कोहली,
कर्णधार भारत.

ओव्हर टू मोहाली...
अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनी हा पहिल्या कसोटीत द. आफ्रिकेसाठी खेळणार नाही. तो तिसऱ्या वन डेदरम्यान जखमी झाला होता. त्याची जखम बरी होण्यास तीन आठवडे लागतील; त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्णधार हाशीम आमला याने पत्रकारांना दिली.

खेळपट्टी मंद
राहील - क्युरेटर
पीसीएच्या खेळपट्टीबाबत कितीही कयास लावले जात असले, तरी क्युरेटर दलजितसिंग यांच्या मते ही खेळपट्टी जुनी असल्याने सामन्यादरम्यान मंद पडेल. या सामन्याचा निश्चितपणे निकाल लागेल. २३ वर्षे जुन्या असलेल्या या खेळपट्टीचा लाभ दोन्ही संघांना मिळणार आहे. येथे फिरकीला अधिक वाव असल्याचे दलजित यांचे मत आहे.

तळाच्या फलंदाजांचा सराव
पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील तळाच्या फलंदाजांनी नेटमध्ये फलंदाजी केली. वरुण अ‍ॅरोन, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांनी फलंदाजीचा सराव केला. रवी शास्त्री यांच्यासह सहायक कोच संजय बांगर हे प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करीत होते. त्यानंतर आश्विन, अमित मिश्रा आणि जडेजा यांनी गोलंदाजीवरदेखील लक्ष केंद्रित केले. या तिन्ही फिरकी गोलंदाजांना अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळेल, अशी चर्चा आहे.

जडेजासह ५ गोलंदाज
असावेत - गावसकर
नवी दिल्ली : कसोटी संघात चार गोलंदाज असावे की पाच यावर सातत्याने मतभेद होत असताना माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी मात्र रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्याचा सल्ला देत त्याच्या समावेशामुळे संघाला अष्टपैलू म्हणून पाचवा गोलंदाजही मिळेल असे सुचवले.

Web Title: India's revolting spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.