भारताची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: October 8, 2015 04:28 IST2015-10-08T04:28:49+5:302015-10-08T04:28:49+5:30
योग्य संतुलन राखून तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० मध्ये गुरुवारी द. आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया विजय मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार आहे.

भारताची प्रतिष्ठा पणाला
कोलकाता : योग्य संतुलन राखून तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० मध्ये गुरुवारी द. आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया विजय मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार आहे.
कटकच्या दुसऱ्या सामन्यात सहा गड्यांनी विजय नोंदवित आफ्रिकेने मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली. भारत या सामन्यात निचांकी ९२ धावांत गारद झाला. शिवाय, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना दोनदा थांबविण्यात आला होता. जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यात भारताला अशाच प्रकारच्या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अखेरचे दोन सामने गमावताच भारताने यजमानांना मालिका १-२ ने गमावली होती.
ईडनचा सामना औपचारिकतेचा असेलही; पण धोनी अँड कंपनीसाठी तो महत्त्वपूर्ण राहील. हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेआधी भारताला विजयी पथावर यायचे आहे. यासाठी धोनीने मात्र आपल्या आवडीचे अंबाती रायडू आणि अक्षर पटेल यांच्याऐवजी अजिंक्य रहाणे व अमित मिश्रा यांना संधी देण्यास हरकत नाही. रहाणेऐवजी रायुडूला झुकते माप दिल्याप्रकरणी धोनीवर सडकून टीका झाली. त्यामुळे गुरुवारी रहाणे खेळण्याची शक्यता आहे.
ईडनची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने मिश्रालादेखील संधी मिळू शकते; पण पटेल आणि हरभजन यांच्या तुलनेत मिश्रा हा धोनीच्या पसंतीस कितपत उतरतो, हे पाहावे लागेल. आश्विनचा फॉर्म ही भारताच्या जमेची बाजू आहे. त्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रस्त केलेच; शिवाय डिव्हिलियर्सला दोनदा त्यानेच बाद केले. यामुळे आश्विनकडून मोठ्या अपेक्षा असतील. द. आफ्रिका संघात बदल होण्याची श्क्यता नाही. फाफ डु प्लेसिस हा इम्रान ताहीर वगळता डेव्हिड मिलर आणि जेपी ड्यूमिनी यांच्याकडून अतिरिक्त गोलंदाजी करण्याच्या मनस्थितीत आहे.
(वृत्तसंस्था)
भज्जीला विजयाची आशा : अखेरचा सामना ईडनवर खेळण्याची इच्छा
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२0 क्रिकेट मालिका गमावली असली तरी अनुभवी हरभजनसिंगने अखेरच्या सामन्यात भारतीय संघ जिंकू शकतो, अशी आशा व्यक्त केली.
हरभजन म्हणाला, ‘‘आम्ही मालिका गमावली आहे; परंतु अखेरचा सामना अजून बाकी आहे आणि उद्याचा सामना जिंकू आणि त्यानंतर हीच लय पुढेही कायम ठेवू अशी आशा वाटते. वनडे मालिका सुरू होणार आहे.
त्यानंतर कसोटी सामनेही आहेत. आम्ही उद्या सर्वोत्तम कामगिरी करू आणि एकदा विजय मिळवल्यास आम्हाला पराभूत करणे कठीण असेल.
ईडन गार्डन्सला आॅस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी ही व्हीव्हीएस लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीमुळे ओळखली जाते; परंतु याच सामन्यात हरभजनसिंगने १३ गडीदेखील बाद केले होते. त्यामुळेच
हरभजनसिंगने कारकिर्दीतील अखेरचा सामनाही येथेच खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भज्जी म्हणाला, की मी अद्याप काहीही विचार केला नाही; परंतु अखेरचा सामना ईडनवर खेळण्याची इच्छा आहे व तोही कसोटी सामना असायला हवा. ईडन हे विशेष स्थान आहे. येथे घरी येऊन खेळण्यासारखे आहे. लोकांच्या दृष्टीने इंग्लंडमध्ये क्रिकेटसाठी लॉर्ड्स आहे, तर भारतातही क्रिकेट खेळण्यासाठी सर्वांत चांगले स्थळ ईडन आहे.
उभय संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, हरभजन सिंग, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, स्टुअर्ट बिन्नी आणि एस अरविंद.
दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्यूमिनी, फरहान बेहार्डियेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, काइल एबोट, एल्बी मोर्केल, इम्रान ताहिर, क्विंटन डिकाक, एडी लेइ, मर्चेंट डि लांगे, कयारा झोंडो.