भारताची उपांत्यपूर्व लढत सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये
By Admin | Updated: March 2, 2015 00:53 IST2015-03-02T00:53:35+5:302015-03-02T00:53:35+5:30
सलग तीन विजय मिळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

भारताची उपांत्यपूर्व लढत सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये
आशिष जैन,
सलग तीन विजय मिळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरीची लढत सिडनी किंवा मेलबोर्न यापैकी एका मैदानावर खेळावी लागू शकते.
आयसीसीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींची स्थळे निर्धारित मापदंडानुसार निश्चित केलेली आहेत. त्यानुसार विश्वकप-२०१५ चे सहयजमान असलेले आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड ‘अ’ गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरले तर त्यांना उपांत्यपूर्व फेरीचे सामने मायदेशात अनुक्रमे अॅडिलेड व वेलिंग्टन येथे २० व २१ मार्च रोजी खेळण्याची संधी मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींच्या स्थळांची घोषणा करताना आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) जिआॅफ अलार्डाइस म्हणाले, ‘विश्वकप क्रिकेट स्पर्धेदरम्यान यजमान संघांना उपांत्यपूर्व फेरीचा सामना मायदेशात खेळण्याची संधी प्रदान करण्याची परंपरा आहे. या परंपरेचे २०१५ च्या विश्वकप स्पर्धेदरम्यानही पालन करण्यात येईल.’
उपांत्यपूर्व फेरीचे सामने सहयजमान असलेल्या देशांमध्ये आयोजित करण्याचा उद्देश सर्व आठ संघांना आपल्या सामन्याच्या स्थळी पोहोचण्यासाठी व तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा असतो. संबंधित देशांच्या चाहत्यांनाही या लढतीच्या स्थळी पोहोचण्यासाठी अडचण भासत नाही. भारताला उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये जाण्याची गरज नाही. टीम इंडिया सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये ही लढत खेळेल.