भारताचा पेनल्टी कॉर्नरवर भर
By Admin | Updated: June 19, 2015 23:39 IST2015-06-19T23:39:04+5:302015-06-19T23:39:04+5:30
भारतीय हॉकी संघाने पहिल्या सराव सामन्यात फ्रान्सवर विजय मिळविला असला तरी शनिवारपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या पहिल्याच लढतीत भारतीय

भारताचा पेनल्टी कॉर्नरवर भर
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाने पहिल्या सराव सामन्यात फ्रान्सवर विजय मिळविला असला तरी शनिवारपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या पहिल्याच लढतीत भारतीय संघ पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर भर देत विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचे मुख्य कोच पॉल वान यांनी कुठली कसर शिल्लक न राखता विजय मिळवा, असे खेळाडूंना आवाहन केले.
ते म्हणाले, ‘भारतीय खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नर मिळवून चालणार नाही, तर या संधीचे गोलमध्ये रूपांतरदेखील करावे. सराव सामन्यात देखणी कामगिरी करणारा भारतीय संघ फॉर्ममध्ये आहे. उद्या खरे आव्हान पुढे आहे. ब्रिटनविरुद्धचा सामना आमच्यासाठी लाभदायी ठरला. त्यामुळे स्पर्धेतील दडपण कमी होण्यास मदत झाली. फ्रान्सचा संघ सहज हार मानत नसल्यामुळे प्रत्येक आघाडीवर आम्हाला सावध खेळावे लागेल. पेनल्टी कॉर्नर मिळविणे आणि गोलमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे.’ भारतीय संघ फ्रान्सविरुद्ध खेळेल त्याच वेळी महिला संघाची लढत बेल्जियमविरुद्ध होईल.
नवव्या स्थानावर असलेल्या भारताच्या गटात आॅस्ट्रेलिया, पोलंड, फ्रान्स आणि पाक संघ आहे. मागचा रेकॉर्ड पाहिल्यास उद्याच्या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.
चेंडूवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे!
या सामन्यात नव्या डावपेचांसह खेळणार आहोत. चेंडूवर नियंत्रण ठेवणे आणि आक्रमक खेळणे गरजेचे आहे. सराव सामन्यात खेळलो त्याहून अधिक सर्वोत्तम खेळ करीत सामना जिंकू. सुरुवातीला मिळणाऱ्या संधीचा लाभ घेत दडपण आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- सरदारासिंग,
कर्णधार, भारत.