भारताचा ऐतिहासिक विजय

By Admin | Updated: December 8, 2015 02:24 IST2015-12-08T02:24:54+5:302015-12-08T02:24:54+5:30

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाचव्या व अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला.

India's historic win | भारताचा ऐतिहासिक विजय

भारताचा ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली : रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाचव्या व अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० ने ऐतिहासिक विजय साकारला.
विजयासाठी ४८१ धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने बचावात्मक पवित्रा स्वीकारला, पण त्यांचा डाव १४३.१ षटकांत १४३ धावांत संपुष्टात आला. अखेरच्या पाच विकेट नाट्यमयरीत्या केवळ ७ धावांच्या अंतरात पडल्या.
या विजयासह भारताने आयसीसी कसोटी क्रमावारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. अश्विनने मोर्नी मोर्कलचा त्रिफळा उडवत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळला. या मालिकेतील भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज अश्विनने ४९.१ षटकांत ६१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. कर्णधार विराट कोहली व सामनावीर अजिंक्य रहाणे यांनी विजयाची आठवण म्हणून खेळपट्टीवरून स्टम्प नेताना जल्लोष केला. खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. प्रेक्षकांनी उभे राहून खेळाडूंच्या अभिवादनाचा स्वीकार केला.
ए.बी. डिव्हिलियर्सने २९७ चेंडूंना सामोरे जाताना ४३ धावांची खेळी केल्यामुळे एकवेळ दक्षिण आफ्रिका संघ लढत अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरेल, असे चित्र होते, पण अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चित्र बदलले. वेगवान गोलंदाज उमेश यादवने तीन बळी घेतले तर आश्विनने डिव्हिलियर्सचा माघारी परतवले. अश्विनच्या आॅफ ब्रेक चेंडूला डिव्हिलियर्स चुकीच्या पद्धतीने खेळला आणि लेग स्लिपमध्ये तैनात जडेजाला झेल दिला.
यापूर्वी वन-डे व टी-२० सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या वेदनेवर कसोटी मालिकेतील विजयामुळे काही अंशी फुंकर घातली गेली. विजयाचे श्रेय उमेश यादवलाही द्यावे लागेल. यादवने २१ षटकांत केवळ ९ धावा बहाल करताना ३ बळी घेतले. उमेशने अखेरच्या सत्रात डेन विलास व केली एबोट यांना बोल्ड केले तर डेन पीएटला यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले. उपाहारानंतर भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. रवींद्र जडेजाने फॅफ ड्यू प्लेसिसला पायचित करीत महत्त्वाचा अडथळा दूर केला. ड्यू प्लेसिसने ९७ चेंडूंना सामोरे जाताना १० धावा केल्या. अश्विनने जे.पी. ड्युमिनीला (००) बाद करीत मालिकेतील ३० वा बळी नोंदवला.
त्याआधी, दक्षिण आफ्रिका संघाने सकाळच्या सत्रात ३१ षटकांत केवळ ४२ धावा केल्या. अखेरचे सत्र प्रारंभ होण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरेल, असे चित्र होते. भारतीय गोलंदाजांनी मात्र त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. जगातील सर्वोत्तम फलंदाज डिव्हिलियर्सने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न करीत सर्वोत्तम खेळाडू परिस्थितीनुसार खेळामध्ये कसा बदल करू शकतो, हे सिद्ध केले. जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाज डिव्हिलियर्सने संयमी फलंदाजी केली. सकाळच्या सत्रात जडेजाने शानदार मारा करीत अमलाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. कर्णधार अमलाने खाते उघडण्यासाठी ४६ चेंडू प्रतीक्षा केली होती. ड्यूप्लेसिसने ५३ व्या चेंडूवर खाते उघडले. यापूर्वी ड्यूप्लेसिसने अ‍ॅडिलेडमध्ये (२०१२) बचावात्मक पवित्रा स्वीकारताना ७ तास ४६ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना ११० धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाला विजयापासून वंचित रहावे लागले होते. त्यावेळी दुसऱ्या टोकाला त्याचा सहकारी होता डिव्हिलियर्स. त्याने २२० चेंडू खेळताना ३३ धावा केल्या होत्या. ड्यूप्लेसिसने खाते उघडण्यासाठी सर्वांत अधिक चेंडू खेळण्याचा ग्रांट फ्लावरचा (२००० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५१ चेंडू) विक्रम मोडला. अमलाचा स्ट्राईक रेट १०.४४ होता. (वृत्तसंस्था)
धावफलक : भारत पहिला डाव ३३४. दक्षिण आफ्रिका पहिला डाव १२१. भारत दुसरा डाव ५ बाद २६७ (डाव घोषित).
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव :- डीन एल्गर झे. रहाणे गो. अश्विन ०४, तेंबा बावुमा त्रि. गो. आश्विन ३४, हाशिम अमला त्रि. गो. जडेजा २५, ए.बी. डिव्हिलियर्स झे. जडेजा गो. आश्विन ४३, फॅफ ड्यूप्लेसिस पायचित गो. जडेजा १०, जे.पी. ड्युमिनी पायचित गो. आश्विन ००, डेन विलास त्रि. गो. यादव १३, केली एबोट त्रि. गो. यादव ००, डेन पिएट झे. साहा गो. यादव ०१, मोर्नी मोर्कल त्रि. गो. आश्विन ०२, इम्रान ताहिर नाबाद ००. अवांतर (११). एकूण १४३.१ षटकांत सर्वबाद १४३. बाद क्रम : १-५, २-४९, ३-७६, ४-१११, ५-११२, ६-१३६, ७-१३६, ८-१४०, ९-१४३, १०-१४३. गोलंदाजी : ईशांत २०-१२-२३-०, अश्विन ४९.१-२६-६१-५, जडेजा ४६-३३-२६-२, यादव २१-१६-९-३, धवन ३-१-९-०, विजय २-०-२-०, कोहली १-१-०-०, पुजारा १-०-२-०.
चेन्नई पूरग्रस्तांना
विजय समर्पित भारतीय कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारी टीम इंडियाने मिळवलेल्या ३-० मालिका विजय चेन्नईतील पूरग्रस्तांना समर्पित केला. त्यांनी भारतीय सेनेतर्फे राबविल्या जात असलेल्या बचाव कार्याची प्रशंसा केली.

Web Title: India's historic win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.