आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण चौकार, कुस्तीमध्ये योगेश्वरचा गोल्डन पंच
By Admin | Updated: September 28, 2014 17:44 IST2014-09-28T16:22:29+5:302014-09-28T17:44:34+5:30
कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या 'गोल्डन' पंचमुळे भारताने आशियाई स्पर्धेत रविवारी सुवर्ण चौकार मारला आहे.

आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण चौकार, कुस्तीमध्ये योगेश्वरचा गोल्डन पंच
ऑनलाइन लोकमत
इंचियोन, दि. २८ - कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या 'गोल्डन' पंचमुळे भारताने आशियाई स्पर्धेत रविवारी सुवर्ण चौकार मारला आहे. कुस्तीमध्ये (फ्री स्टाईल ६५ किलो गट) योगेश्वरने ताजीकिस्तानच्या जालीम खानवर मात करत भारताला स्पर्धेतील चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले. आशियाई स्पर्धेत तब्बल २८ वर्षांनी भारताला कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. या चमकदार कामगिरीमुळे पदकतालिकेत भारत ४ सुवर्ण, ५ रौप्य व २६ कांस्य पदकांसह ८ व्या स्थानावर पोहोचला आहे.
रविवारी भारतीय खेळाडूंमध्ये आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करत भारताला १३ व्या स्थानावरुन थेट आठव्या स्थानावर आणले. यामध्ये मोलाचा हातभार लावला तो कुस्तीपटू योगेश्वर दत्तने. आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला तब्बल २८ वर्षांनी योगेश्वरने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. कुस्तीपटू सुशीलकुमारच्या अनुपस्थितीत भारतीय क्रीडा प्रेमींना योगेश्वरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. योगेश्वरने त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत ताजीकिस्तानच्या कुस्तीपटूला धूळ चारुन भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले.
आज दिवसभरात भारताला मिळालेली पदकं
> धावपटू राजीव अरोकियाला ४०० मीटरच्या स्पर्धेत कांस्य पदक
> हॅमर थ्रोमध्ये मंजू बालाला कांस्यपदक.
> टेनिस पुरुष दुहेरीमध्ये दिविज शरण आणि युकी भांबरीला कांस्य पदक
> टेनिसमध्ये महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे या जोडीने कांस्य पदक पटकावले.
> भारताच्या युकी भांबरीने टेनिसमध्ये (पुरुष एकेरी) कांस्य पदक पटकावले
> महिला धावपटू खुशवीर कौरने २० किमी रेस वॉकमध्ये रौप्य पदक पटकावले