भारताची आज ओमानशी लढत
By Admin | Updated: June 11, 2015 08:49 IST2015-06-11T01:02:01+5:302015-06-11T08:49:03+5:30
भारतीय फुटबॉल संघाचा ‘फिफा विश्वचषक स्पर्धे’च्या एएफसी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सत्रातील पहिला सामना आज गुरुवारी ओमानबरोबर होणार आहे.

भारताची आज ओमानशी लढत
बंगलोर : भारतीय फुटबॉल संघाचा ‘फिफा विश्वचषक स्पर्धे’च्या एएफसी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सत्रातील पहिला सामना आज गुरुवारी ओमानबरोबर होणार आहे. जागतिक क्रमवारीत खूप वरच्या क्रमांकावर असलेल्या ओमानबरोबरची लढत भारतासाठी कठीण असणार आहे.
इंग्लडच्या स्टीफन कोरेंस्टेटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. मार्च महिन्यात झालेल्या पात्रता फेरीत भारताने नेपाळला पराभूत केले होते. मात्र, ओमानला पराभूत करण्यासाठी भारताला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. जागतिक क्रमवारीत ओमान १०१ व्या क्रमांकावर असून, तो भारतापेक्षा ४० क्रमांकानी पुढे आहे.
भारतीय संघाने या सामन्यासाठी खूप चांगली तयारी केली आहे. मागील शनिवारी येथे भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या शिबिरातही भारतीय संघाने सहभाग घेतला होता. ओमानविरुद्धच्या सामन्यात सुब्रत पालऐवजी अर्णव मंडल संघाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती कोरेस्टेंटाईन यांनी दिली.
ओमानविरुद्ध आजपर्यंत झालेल्या चार सामन्यांत भारताने एक विजय दोन पराभव व एक सामना बरोबरीत सोडविला आहे. फेबु्रवारी २०१२ मध्ये दोन्ही संघांची शेवटची लढत झाली होती. हा सामना ओमानने ५-० अशा गोल फरकाने जिंकला होता. पहिल्या सत्रात नेपाळ विरुद्धचा पहिला सामना भारताने २-० असा, तर दुसरा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. ओमानला २०१४ च्या पात्रता फेरीत आलेल्या अपयशाच्या कटू आठवणी विसरण्यासाठी उद्याचा सामना महत्त्वाचा आहे.
कोरेंस्टेटाईनने अनुभवी खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंवर विश्वास दाखविला आहे. २६ संभाव्य खेळाडूंत त्यांनी जॅकीचंद सिंग, सी. के. विनित, धनपाल गणेश व शहनाज सिंग यांना स्थान दिले आहे. भारताचे लक्ष्य मधल्या फळीच्या कामगिरीकडे असणार आहे. ओमानच्या आक्रमणाची धार कमी करण्यासाठी अर्नव मंडल व सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. स्थानिक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर शहनाज व युजेंसन
लिंगडोह यांची निवड होण्याची शक्यता आहे. गोल करण्याची जबाबदारी रॉबिन सिंग व सुनील छेत्री यांच्यावर असणार आहे.
ओमानला त्यांच्या अल ओवैसी व मोहम्मद अल शैयबी यांची उणीव भासणार आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतींमुळे बाहेर आहेत. ओमानची सर्व मदार अली सलीम अल नाहर याच्यावर असणार आहे.
या गटात भारत व ओमानशिवाय इराण, तुर्कमेनिस्तान व गुआम यांचा समावेश आहे. यातील दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
(वृत्तसंस्था)