‘क्लीन स्वीप’चा भारताचा निर्धार
By Admin | Updated: June 15, 2016 05:21 IST2016-06-15T05:21:39+5:302016-06-15T05:21:39+5:30
मालिकेत विजयी आघाडी घेणारा भारतीय संघ उद्या, बुधवारी यजमान झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

‘क्लीन स्वीप’चा भारताचा निर्धार
हरारे : मालिकेत विजयी आघाडी घेणारा भारतीय संघ उद्या, बुधवारी यजमान झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या लढतीत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन लढतीत सहज विजयाची नोंद केल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अंतिम लढतीसाठी संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यजमान संघाला युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे आव्हान पेलवले नाही. आतापर्यंत एकतर्फी ठरलेल्या या मालिकेत उभय संघांच्या चाहत्यांना रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. या मालिकेनंतर हरारे स्पोटर््स क्लबच्या मैदानावरच तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत.
भारताने बुधवारच्या लढतीत विजय मिळवला तर २०१३ व २०१५ नंतर झिम्बाब्वेविरुद्ध सलग तिसरा ‘क्लीन स्वीप’ ठरणार आहे.
कर्णधार धोनीच्या मते भारतीय फलंदाजी क्रमामध्ये बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत केवळ आघाडीच्या तीन फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली आहे. सलामीवीर लोकेश राहुलने पहिल्या लढतीत शतकी खेळी केली. राहुल व तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अंबाती रायडू यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. या दोघांना आतापर्यंत फलंदाजीची बरीच संधी मिळाली आहे. त्यांच्या स्थानी फैज फझल व करुण नायर यांना डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. रायडूच्या स्थानी मनदीप सिंगला संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये बरदिंर सरण, धवल कुलकर्णी किंवा जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. या तिन्ही गोलंदाजांची पहिल्या दोन्ही लढतींत कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. जयदेव उनाडकट व अष्टपैलू ऋषी धवन यांना संधी मिळू शकते. लेगस्पिनर युजवेंद्र चहलची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. आॅफस्पिनर जयंत यादवला संधी देण्यासाठी चहल किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला विश्रांती देण्यात येईल.
धोनीने सलग दोन सामन्यांत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत पहिल्या लढतीच्या तुलनेत खेळपट्टी चांगली होती. तेथे फटके खेळण्याची संधी होती. दुसऱ्या बाजूचा विचार करताना झिम्बाब्वे संघ प्रत्येक विभागात कमकुवत ठरला आहे. फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचे आव्हान पेलता आले नाही तर गोलंदाजांना विशेष छाप सोडता आली नाही. वुसी सिंबाडाने सोमवारी ६९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली, पण संघाला मोठी भागीदारी करता आलेली नाही.
कर्णधार ग्रीम क्रेमरने निराशाजनक फलंदाजी व नाणेफेक गमावल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया दिली. झिम्बाब्वेच्या खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये झिम्बाब्वेने चांगली कामगिरी केली असली तरी त्यांना विकेट घेता आल्या नाही. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), केएल राहुल, फैज फजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, केदार जाधव, मनदीप सिंग, ऋषी धवन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, युजवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल.
झिम्बाब्वे : ग्रीम क्रेमर (कर्णधार), तेंडाई चतारा, चामू चिभाभा, एल्टन चिगुंबुरा, तेंडाई चिसोरो, क्रेग इरविन, नेविले मेजिवा, तिमीकेन मारुमा, हॅमिल्टन मसाकाजा, वेलिंग्टन मसाकाजा, पीटर मूर, तवांडा मूपरीवा, रिचर्ड मुटुम्बामी, टी मुजाराबानी, वुसी सिबांडा, सिकंदर रजा, डोनाल्ड तिरिपानो, सीन विलियम्स.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० पासून.