सुलतान अझलान शाह हॉकी कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव
By Admin | Updated: April 16, 2016 20:00 IST2016-04-16T20:00:41+5:302016-04-16T20:00:41+5:30
ऑस्ट्रेलियन संघाने सुलतान अझलन शाह हॉकी कपच्या अंतिम सामन्यात 4 -0 ने भारताचा पराभव केला आहे

सुलतान अझलान शाह हॉकी कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव
>ऑनलाइन लोकमत -
इपोह, दि. १६ - ऑस्ट्रेलियन संघाने सुलतान अझलन शाह हॉकी कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला आहे. अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने नवव्यांदा सुलतान अझलान शाह हॉकी कपवर आपलं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाने 4 -0 ने भारताचा पराभव केला आहे. भारताला मात्र एकही गोल करता आला नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन संघाने आघाडी घेतली होती. मध्यांतरापुर्वी ऑस्ट्रेलियाने 1 -0 ने आघाडी घेतली होती. क्रेगने 29 व्या मिनिटाला पहिला आणि 35 व्या मिनिटाला दुसरा गोल मारत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. त्यानंतर मॅटने 43व्या मिनिटाला तिसरा आणि 58व्या मिनिटाला चौथा गोल मारत भारतावर विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने कॅनडाला ३-० ने हरवत अंतिम सामन्यात धडक मारली होती. गेल्या सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारताने कांस्य पदक तर ऑस्ट्रेलियाने उपविजेते पद मिळवलं होतं. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या भारत संघाला स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. पण 'करो या मरो'च्या सामन्यात मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा ६-१ अशा फरकाने धुरळा उडवत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम सामन्यात भारताची मोठी निराशा झाली.