भारताचे लक्ष्य ‘क्लीन स्वीप’चे
By Admin | Updated: December 3, 2015 03:24 IST2015-12-03T03:24:44+5:302015-12-03T03:24:44+5:30
येथील फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असताना भारतीय संघ आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत विजय नोंदवित
भारताचे लक्ष्य ‘क्लीन स्वीप’चे
नवी दिल्ली : येथील फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असताना भारतीय संघ आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत विजय नोंदवित द. आफ्रिकेचा ‘सफाया’ करण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारताला मालिकेत २-० अशी आघाडी मिळाली असल्याने हा सामना जिंकून ३-० अशा मोठ्या विजयासोबतच आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचा भारताचा इरादा दिसतो. व्हीसीएच्या खेळपट्टीची मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी आयसीसीकडे तक्रार नोंदविल्याने कोटलाची खेळपट्टी कशी असेल याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संघ संचालक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी मोहाली, बेंगळुरू आणि नागपूरच्या खेळपट्ट्यांवर झालेली टीका खोडून काढली होती. पण दिल्लीच्या खेळपट्टीची वाट लागल्यास दोघांनाही उत्तर देताना ‘नाकी नऊ’ येऊ शकते. कोटलाची खेळपट्टी पूर्णपणे टर्निंग नाही पण ती मंद आहे आणि पाच दिवसांत स्वरूप बदल्याची शक्यता नाही.
भारतीय फिरकीने द. आफ्रिकेचे ५० पैकी ४७ गडी बाद केले. त्यात अश्विनचे २४ आणि जडेजाचे १६ व अमित मिश्राचे सात बळी आहेत. रणजी सामन्यात याच खेळपट्टीवर आॅफ स्पिनर मनन शर्मा याने २१ गडी बाद केले. जडेजा देखील लाईन आणि लेंग्थचा समन्वय साधून संधीचा लाभ घेऊ शकतो.
गोलंदाजांनी मालिकेत विजय मिळवून दिला पण फलंदाजीत अद्यापही भारताची चिंता आहेच. मुरली विजयने सर्वाधिक १९५ तर चेतेश्वर पुजाराने १६० धावा केल्या. पण आघाडीचे अन्य फलंदाज मालिकेत १०० धावा देखील नोंदवू शकले नाहीत. विजयी संयोजन कायम राखले जाते पण कोहलीने संघात वारंवार बदल केले. मोहालीत बिन्नीला खेळविल्यानंतर बेंगळुरूत अमित मिश्राला संधी दिली. नागपुरात बिन्नीऐवजी रोहित शर्माला आणि मिश्राच्या जागी वरुण अॅरोनला संधी दिली.
कोटलावर सकाळचे सत्र वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरते. इशांतला त्याचा लाभ मिळू शकतो. द. आफ्रिकेसाठी डेल स्टेनचे खेळणे अद्याप शंकास्पद आहे. अशावेळी मोर्ने मोर्केलला संघाची बाजू सांभाळण्याचे आव्हान असेल. द. आफ्रिकेसाठी सर्वाधिक १७३ धावा एबी डिव्हिलियर्सने केल्या आहेत. नागपुरात अमला आणि डुप्लेसिस यांच्यात झालेली शतकी भागीदारी दिलासा देणारी असली तरी कर्णधार अमला अद्याप मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला हे सत्य आहे.
दहशतवादी हल्ल्याची भीती; कोटलावर कडेकोट व्यवस्था
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून धडा घेत खबरदारीचा उपाय म्हणून फिरोजशाह कोटलावर चौथ्या कसोटीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सामन्याच्या निमित्ताने प्रथमच एकीकृत सुरक्षा उभारण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त परमादित्य यांनी दिली.
ते म्हणाले,‘कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी एका अलार्मवर अख्ख्ये स्टेडियम रिकामे होऊ शकेल . बटन दाबताच एकाचवेळी अलार्म वाजतील व लोक झटपट बाहेर पडतील, अशी व्यवस्था आहे. सामन्याच्या निमित्ताने तीनस्तरीय सुरक्षा असेल.
विजयी सांगता
करू : आमला
संघाची इभ्रत कायम राखण्यासाठी चौथी कसोटी जिंकून विजयी सांगता करण्यास आम्ही इच्छुक आहोत. तयारी चांगली असून सहकारी कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. हा दौरा रोमहर्षक आणि आव्हानात्मक होता. अडीच दिवसांत सामने संपल्याने युवा खेळाडूंसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरेल. उद्या स्टेन खेळणार नाही पण अंतिम ११ खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळ करतील, अशी आशा आहे.
भारत :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींंद्र जडेजा, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, वरुण अॅरोन, उमेश यादव, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार, गुरकीरत सिंग मान आणि स्टुअर्ट बिन्नी.
दक्षिण आफ्रिका :
हाशिम अमला(कर्णधार), एबी डिव्हिलियर्स , स्टियान वान झिल, डीन एल्गर, फाफ डु प्लेसिस, जेपी ड्यूमिनी, डेन विलास, सिमोन हार्मर, इम्रान ताहिर, मोर्ने मोर्केल, कागिसो रबाडा, डेल स्टेन, तेंबा बावुमा, मर्चेंट डी लांगे, काइल एबोट,
डेन पीएट.