जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेवर भारताचा बहिष्कार
By Admin | Updated: June 6, 2015 01:12 IST2015-06-06T01:12:58+5:302015-06-06T01:12:58+5:30
भारतीय संघाच्या सदस्यांना अमेरिकन दूतावासाने व्हिसा न दिल्यामुळे भारतीय तिरंदाजी संघाला जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पधतून अखेर माघार घ्यावी लागली.

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेवर भारताचा बहिष्कार
नवी दिल्ली : कोरियन प्रशिक्षक चाए वोम लिमसह भारतीय संघाच्या सदस्यांना अमेरिकन दूतावासाने व्हिसा न दिल्यामुळे भारतीय तिरंदाजी संघाला जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पधतून अखेर माघार घ्यावी लागली. भारतीय तिरंदाजी महासंघाचे कोशाध्यक्ष वीरेंद्र
सचदेवा यांनी याविषयी सांगितले
की, व्हिसा नाकरण्याचा विरोध
म्हणून आम्ही स्पर्धेतून माघार
घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय एएआयचे अध्यक्ष कुमार मल्होत्रा यांनी घेतला असून आम्ही पुन्हा एकदा व्हिजासाठी निवेदन केलेला आहे.
भारतीय संघात २0 वर्षांखालील मुले आणि मुली आहेत. ज्युनिअर तिरंदाजांना शनिवारी अमेरिकेला रवाना व्हायचे होते. ते ८ ते १४ जूनदरम्यान साऊथ डकोटाच्या यांकटोन येथील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
अमेरिकन दूतावासाने फक्त सात तिरंदाज, दोन प्रशिक्षक आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यास व्हिसा दिला आहे, तर अन्य २0 जणांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे. लिम यांच्याशिवाय भारतीय प्रशिक्षक मिम बहादूर गुरंग, चंद्रशेखर लागुरी, राम अवधेश आणि मालिशिये पिंकी यांनादेखील व्हिसा मिळाला नाही.
व्हिसा अधिकारी या उमेदवारांच्या मुलाखतीने समाधानी नव्हते आणि त्यांना यातील अनेक जण स्पर्धेनंतर परतणार नाही अशी शंका होती, असे वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.
सचदेवा म्हणाले ही धक्कादायक घटना आहे. आमच्या सर्वाधिक तिरंदाज असम, झारखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील आहेत. अनेकांना इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे ते त्यांची बाजू व्यवस्थित मांडू शकले नाही. जेव्हा व्हिसा अधिकाऱ्यांनी त्यांना जीवन जगण्यासाठी काय करता तेव्हा त्यांनी आम्ही तिरंदाज आहोत आणि तिरंदाजी करतो असे उत्तर दिले. त्यामुळे व्हिसा अधिकाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी व्हिसा देण्यास नकार दिला; परंतु लिम यांना व्हिसा का दिला नाही याचे आपल्याला आश्चर्य वाटले. जागतिक तिरंदाजीत हे नाव प्रसिद्ध आहे आणि ते जगभरात फिरलेले आहेत. तिरंदाजी महासंघाने परराष्ट्र मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाशीही संपर्क साधला; परंतु त्यावर तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकन तिरंदाजी महासंघाच्या सल्ल्यावर व्हिसा मिळण्यासाठी पुन्हा अर्ज केला आहे; परंतु उद्यापर्यंत व्हिसा मिळेल की नाही हे सांगता येत नाही. व्हिसा न मिळाल्यास या युवा खेळाडूंनी घेतलेल्या तीन महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल, असे सचदेवा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
अमेरिकन तिरंदाजी महासंघाकडून भारताला निमंत्रण मिळाले होते आणि भारत सरकारनेदेखील त्यास मान्यता
दिली होती; परंतु त्यानंतरही व्हिसा दिला नाही. याचेही आपल्याला आश्चर्य वाटते.
- वीरेंद्र सचदेवा
भारतीय तिरंदाजी
महासंघाचे कोशाध्यक्ष