भारताचा ०-४ ने धुव्वा
By Admin | Updated: July 4, 2015 01:48 IST2015-07-04T01:48:49+5:302015-07-04T01:48:49+5:30
भारताच्या पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान बेल्जियमविरुद्ध ०-४ असा एकतर्फी पराभव

भारताचा ०-४ ने धुव्वा
एंटवर्प : भारताच्या पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान बेल्जियमविरुद्ध ०-४ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक पराभवामुळे विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळालेला भारतीय संघ तृतीय स्थानासाठी लढेल.
दुसऱ्याच मिनिटाला फ्लोरेंटने वेगवान गोल करुन यजमानांना आघाडीवर नेले. यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र बेल्जियमच्या बचावपटूंनी भारतीयांना रोखले. त्याचवेळी ८व्या मिनिटाला कॉसीन्स टांगे याने पेनल्टी कॉर्नरची संधी साधताना यजमानांची आघाडी २-० अशी भक्कम केली. दुसऱ्या सत्रातदेखील बेल्जियमने वेगवान खेळ करताना भारतीयांना दबावाखाली ठेवले. गोल करण्याची संधी साधता येत नसल्याने भारतीयांकडून चुका होऊ लागल्या. याचा पुरेपूर फायदा उचलताना बेल्जियमने बाजी मारली. फ्लोरेंटने दमदार कामगिरी करताना ४१व्या आणि ५३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत संघाला अंतिम फेरीत नेले. (वृत्तसंस्था)