चिनी आव्हानांना भारतीयांकडून हादरे
By Admin | Updated: March 30, 2017 01:12 IST2017-03-30T01:12:19+5:302017-03-30T01:12:19+5:30
बॅडमिंटनमध्ये याआधी चीनी खेळाडूंचे वर्चस्व होते. मात्र गेल्या काही काळातील भारतीय बॅडमिंटनपटूंचा खेळ कमालीचा उंचावला

चिनी आव्हानांना भारतीयांकडून हादरे
महेश चेमटे / नवी दिल्ली
‘बॅडमिंटनमध्ये याआधी चीनी खेळाडूंचे वर्चस्व होते. मात्र गेल्या काही काळातील भारतीय बॅडमिंटनपटूंचा खेळ कमालीचा उंचावला असून या चीनी वर्चस्वाला भारतीय खेळाडूंकडून हादरे बसण्यास सुरुवात झाली,’ अशी प्रतिक्रिया आॅलिम्पिक रौप्य पदक विजेती पी.व्ही.सिंधूने ‘लोकमत’ला दिली.
दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात सिधंूने लोकमतशी विशेष संवाद साधला. इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेची तयारी, राष्ट्रीय स्पर्धा आणि खेळाडू, भारतीय बॅडमिंटनपटूंचे बदलते स्वरुप या बाबींवर सिंधूने आपले मत व्यक्त केले.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिधंूने म्हटले की, ‘भारतीयांचा खेळ गेल्या काही वर्षांच कमालीचा उंचावला आहे आणि याचा सर्वाधिक धसका चीनी खेळाडूंनी घेतला आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी चमकदार खेळ करताना चीनच्या खेळाडूंना पराभूत केले आहे. त्याचबरोबर स्पेन, जपान व कोरीयन शटलर्सही दर्जेदार कामगिरी करत असल्याने चीनच्या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.’
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकल्यानंतर भारतीय शटलर्स राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसत नाही यावर सिंधू म्हणाली, ‘सध्या व्यस्त वेळापत्रकामुळे काही शटलर्सना राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे शक्य होत नाही. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक एकत्र येत असल्याने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देण्यात येते. मात्र राष्ट्रीय स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या हिताचे असते. बॅडमिंटनमध्ये कारकिर्द करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने किमान दोनदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घ्यावा.’
‘ग्लॅमरस गर्ल ’
आॅलिम्पिक पदकावर नाव कोरल्यानंतर अनेक कंपन्यामध्ये सिंधूला ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ नेमण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच एका नामांकीत बॅटरी कंपनीने सिंधूला पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करारबद्ध केले. यासाठी कंपनीने सिंधूला
तब्बल ६ ते ८ कोटी रुपयांत करारबद्ध केल्याची चर्चा आहे. यामुळे बॅडमिंटन स्टार सिंधूला सध्या जबरदस्त ग्लॅमर निर्माण झाले आहे.