भारतीयांचा डबल धमाका
By Admin | Updated: October 10, 2016 04:25 IST2016-10-10T04:25:08+5:302016-10-10T04:25:08+5:30
रशियन ओपन बॅडमिंटन ग्रां-प्रीमध्ये भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत २ गटांमध्ये विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत शिवानी

भारतीयांचा डबल धमाका
व्लादिवोस्तोवाक : रशियन ओपन बॅडमिंटन ग्रां-प्रीमध्ये भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत २ गटांमध्ये विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत शिवानी गड्डे हिने, तर मिश्र दुहेरीत एन. सिक्की रेड्डी-प्रणव चोपडा यांच्या जोडीने बाजी मारली.
महिला गटामध्ये चौथे मानांकन लाभलेल्या शिवानीने विजेतेपदाची दावेदार मानल्या गेलेल्या रशियाच्या येवगेनिया कोसेत्सकाया हिला अंतिम फेरीत अवघ्या २६ मिनिटांत धूळ चारली. ही लढत २१-१०, २१-१३ अशी जिंकून तिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
चुरशीच्या लढतीत वालेरिया सोरोकिना-व्लादिमीर इवानोव या रशियन जोडीला २१-१७, २१-१९ असे नमवून सिक्की-प्रणव जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले. भारताच्याच सिरील वर्मा याला मात्र पुरुष एकेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एका तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या आणि ३ गेमपर्यंत ताणल्या गेलेल्या फायनलमध्ये तो २१-१६, १९-२१, १०-२१ असा पराभूत झाला. (वृत्तसंस्था)