भारतीय महिलांचा दुसरा विजय
By Admin | Updated: May 20, 2014 00:39 IST2014-05-20T00:39:24+5:302014-05-20T00:39:24+5:30
सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्या उत्कृष्ट खेळामुळे महिला संघाने थॉमस अँड उबेर चषकात बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हॉँगकॉँगचा ३-० गेममध्ये पराभव करून दुसरा विजय नोंदविला

भारतीय महिलांचा दुसरा विजय
नवी दिल्ली : स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्या उत्कृष्ट खेळामुळे भारतीय महिला संघाने थॉमस अँड उबेर चषकात बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हॉँगकॉँगचा ३-० गेममध्ये पराभव करून आपला दुसरा विजय नोंदविला. दुसरीकडे, भारतीय पुरुष संघाला दुसर्या लढतीतही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे त्याच्या उपांत्यपूर्व फेरीतील आशा संपुष्टात आल्यात जमा आहेत. सिरी फोर्ट कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या वाय गटात भारतीय महिलांनी रविवारी कॅनडानंतर सोमवारी हॉँगकॉँगला पराभवाची चव चाखायला लावली. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने पहिल्या एकेरीत हॉँगकॉँगच्या पुई यिन यिपला ३५ मिनिटांत २१-९, २१-१० असे पराभूत करून विजयी सुरुवात केली. दुहेरीच्या लढतीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने होई वाह चोऊ आणि लोक यान पुन या जोडीला २१-१७, २१-१३ असे ३१ मिनिटांत पराभूत करून आपल्या संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसर्या एकेरीत भारताची दुसरी अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूने २६ मिनिटांत यिंग मेई चियुंगला २१-८, २१-१० असे नमवून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)