भारतीय महिला हॉकी संघाचा दिमाखदार विजय
By Admin | Updated: April 10, 2017 01:25 IST2017-04-10T01:25:04+5:302017-04-10T01:25:04+5:30
एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात धमाकेदार कामगिरी करताना भारताच्या महिला हॉकी संघाने बेलारुसचा ४-०

भारतीय महिला हॉकी संघाचा दिमाखदार विजय
वेस्ट वँकुवर : एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात धमाकेदार कामगिरी करताना भारताच्या महिला हॉकी संघाने बेलारुसचा ४-० असा फडशा पाडून हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात भारताचा सामना चिलीविरुद्ध होईल. चिलीने उरुग्वेला २-१ असा धक्का देत आगेकूच केली आहे.
या विजयासह भारताच्या महिलांनी जून - जुलै महिन्यात होणाऱ्या महिला हॉकी विश्व लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील जागाही निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा महिला विश्वचषक २०१८ स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धाही असेल.
या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय महिलांनी दबदबा राखण्यास सुरुवात केली. बेलारुसने सुरुवातीलाच ४था आणि ९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला होता. मात्र, जबरदस्त संरक्षण करताना भारताने बेलारुसला यश मिळवून दिले नाही. यानंतर संपूर्ण सामन्यावर एकहाती वर्चस्व राखताना भारतीयांनी दिमाखदार विजय मिळवला.
गुरजीत कौरने १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताला आघाडीवर नेले. यानंतर २०व्या मिनिटाला कर्णधार राणीने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताची आघाडी २-० अशी केली. या दोन गोलच्या जोरावर आक्रमक पवित्रा घेत भारताने आपले वर्चस्व राखले.
४०व्या मिनिटाला राणीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना अप्रतिम मैदानी गोल करून संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली. तसेच, ५८व्या मिनिटाला गुरजीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर भारताला यश मिळवून देत संघाच्या विजयावर ४-० असा शिक्कामोर्तब केला. (वृत्तसंस्था)