भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा विजय
By Admin | Updated: July 23, 2016 19:49 IST2016-07-23T19:49:38+5:302016-07-23T19:49:38+5:30
तब्बल ३६ वर्षांनी मिळवलेला ऑलिम्पिक प्रवेश हा कोणताही योगायोग नसल्याचा सिध्द करताना भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिका दौ-यात कॅनडाचा ५-२ असा पराभव करुन सलग दुसरा विजय नोंदवला

भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा विजय
>ऑनलाइन लोकमत -
अमेरिका दौरा हॉकी : कॅनडाला ५-२ असे लोळवले
मॅनहीम (अमेरिका), दि. 23 - तब्बल ३६ वर्षांनी मिळवलेला ऑलिम्पिक प्रवेश हा कोणताही योगायोग नसल्याचा सिध्द करताना भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिका दौ-यात कॅनडाचा ५-२ असा पराभव करुन सलग दुसरा विजय नोंदवला. रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिका दौ-यावर आलेल्या भारतीय संघाने वंदना कटारिया आणि दीपिका यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी २ गोलच्या जोरावर बाजी मारली.
आक्रमक सुरुवात केलेल्या भारताने सुरुवातीपासूनच कॅनडावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक हल्ले केले. वंदनाने नवव्याच मिनिटाला अप्रतिम गोल करताना भारताला आघाडीवर नेले. तर यानंतर दुस-या क्वार्टरमध्ये कॅनडाच्या स्टेफनी नोरलँडने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना सामना १-१ असा बरोबरीत आणला.
मध्यंतराला बरोबरी कायम राहिल्यानंतर पुन्हा एकदा भारताने आक्रमक भूमिका घेतली. तिस-या क्वार्टरमध्ये कॅनडानेही जोरदार प्रत्युत्तर देताना गोल करण्याच्य संधी निर्माण केल्या. मात्र भक्कम बचाव करताना भारताने त्यांना गोल करण्यापासूना रोखले. त्यात, ३८व्या मिनीटाला दीपिकाने शानदार गोल करताना संघाला २-१ असे आघाडीवर नेले. यानंतर चारच मिनीटांनी ब्रिनी स्टेयर्सने गोल करुन पुन्हा एकदा कॅनडाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
यावेळी कॅनडा वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. परंतु, भारतीयांनी झुंजार खेळ करताना नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अंतिम क्वार्टरमध्ये भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखले. दीपिकाने पुन्हा एकदा सुत्रे आपल्याकडे घेताना ४९व्या मिनीटाला दुसरा वैयक्तिक गोल करुन भारताला ३-२ असे आघाडीवर नेले. तर, यानंतर दोन मिनिटांनी वंदनाने आणखी एक गोल नोंदवून भारताची आघाडी ४-२ अशी भक्काम केली. तर, ५८व्या मिनिटाला पूनमने वेगवान गोल करताना भारताच्या विजयावर ५-२ असा शिक्कामोर्तब केला.