भारतीय महिलांना पराभवाचा धक्का
By Admin | Updated: July 19, 2016 21:25 IST2016-07-19T21:25:15+5:302016-07-19T21:25:15+5:30
आगामी आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी कांस्य पदक विजेत्या अमेरिकेविरुध्द

भारतीय महिलांना पराभवाचा धक्का
अमेरिकाविरुध्द पराभव : आॅलिम्पिक तयारीच्या सुरुवातीलाच झटका
मॅनहीम : आगामी आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी कांस्य पदक विजेत्या अमेरिकेविरुध्द २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला. दडपणाच्यावेळी खेळ उंचावण्यात अपयशी ठरल्याने भारताच्या महिलांना अटीतटीची लढत गमवावी लागली.
सावध सुरुवात केलेल्या भारताला पहिल्या सत्रात अमेरिकेच्या वेगवान खेळाचा सामना करावा लागला. सहाव्याच मिनिटाला कॅथलीन शार्कीने केलेल्या वेगवान गोलच्या जोरावर अमेरिकेने १-० अशी आघाडी घेतली. तर यानंतर जोरदार हल्ला चढवलेल्या भारताने गोल करण्याचा शानदार प्रयत्न केला. वंदना कटारिया हिने अमेरिकेच्या गोलपोस्टवर जबरदस्त हल्ला केला. मात्र चेंडू गोलपोस्टला स्पर्शकरुन निघाल्याने भारताची बरोबरी साधण्याची संधी हुकली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दमदार खेळ करताना अमेरिकेला गोल करण्यापासून दूर ठेवले. मात्र गोल करण्यातही अपयश आल्याने भारताला मध्यंतराला एका गोलने पिछाडीवर राहावे लागले. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने बरोबरी साधण्यासाठी आक्रमक खेळ केला. मात्र अमेरिकेचा बचाव भेदण्यात भारतीय महिलांना यश आले नाही. त्यात, ३१व्या मिनिटाला केटी बैमने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना अमेरिकेला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र, दबावामध्ये आलेल्या भारताच्या महिलांनी झुंजार खेळ करताना प्रीती दुबे (३३ मिनिट) आणि दिपिका (३८ मिनिट) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारताने २-२ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. मात्र ४८व्या मिनिटाला कैल्सी कोलोजेजचिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर अमेरिकेने ३-२ अशी आघाडी घेत हीच आघाडी अखेरपर्यंत टिकवताना बाजी मारली. (वृत्तसंस्था)