भारतीय महिला जपानविरुद्ध पराभूत
By Admin | Updated: May 19, 2016 05:26 IST2016-05-19T05:26:20+5:302016-05-19T05:26:20+5:30
जपानविरुद्ध २-० अशी मजबूत आघाडी मिळवल्यानंतरही, भारतीय महिलांना उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेच्या ‘ड’ गटात २-३ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला

भारतीय महिला जपानविरुद्ध पराभूत
कुनशान : जपानविरुद्ध २-० अशी मजबूत आघाडी मिळवल्यानंतरही, भारतीय महिलांना उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेच्या ‘ड’ गटात २-३ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी दुसरीकडे भारताच्या पुरुष संघाना थॉमस कपच्या ‘ब’ गटात सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.
दरम्यान, या अनपेक्षित पराभवानंतरही भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. गटात जपाननंतर दुसरे स्थान पटकावण्यात भारतीय महिलांना यश आल्याने त्यांचा बाद फेरीत प्रवेश झाला. या आधी भारताच्या महिलांनी आॅस्टे्रलिया व जर्मनी यांच्याविरुद्ध ५-० असा दणदणीत विजय मिळवला होता. दुसरीकडे पुरुष गटात मात्र भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. इंडोनेशियाविरुद्ध भारताला ०-५ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या आधी हाँगकाँगविरुद्धही भारताला २-३ अशा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले होते. विशेष म्हणजे, आगामी रिओ आॅलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरुष संघाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिलांच्या गटात जपानविरुद्धचा सामना रोमांचक ठरला. सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या दोन्ही बलाढ्य खेळाडूंनी आपापल्या एकेरी लढती जिंकून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर भारताने दुहेरी व एकेरी लढत गमावली. निर्णायक दुहेरी सामन्यातही अश्विनी पोनप्पा - सिंधू जोडीला दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताची हार झाली. सायनाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या नोजोमी ओकुहाराला २१-१८, २१-६ असे लोळवले, तर सिंधूने जपानच्या अकाने यामागूची हिला २१-११, २१-१८ असे पराभूत करून भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली.
यानंतर ज्वाला गुट्टा - एन. सिक्की रेड्डी यांना मिसाकी मत्सुतोमो - अयाका ताकाहासी विरुद्ध ११-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागला, तर एकेरीत जपानच्या सयाका सातोने रित्विका शिवानी गाडेचा २१-७, २१-१४ असा फडशा पाडून सामना २-२ असा बरोबरीत आणला. यानंतर, निर्णायक ठरलेल्या दुहेरी लढतीत अश्विनी पोनप्पा - सिंधू या अनुभवी खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मात्र, जपानच्या शिजुका मत्सुओ-मामी नाइतो यांनी मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना २-१ अशी बाजी मारली.
>पुरुषांच्या थॉमस कप स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताला इंडोनेशियाविरुद्ध ५-० असा दारुण पराभव पत्करावा लागला. पहिल्याच लढतीत अजय जयरामचा क्रिस्टी जोनाथनने धुव्वा उडवल्यानंतर, मनु अत्री - अक्षय देवालकर यांनाही अंगा प्रात्मा - रिकी सुवार्दी विरुद्ध १८-२१, १७-२१ असा पराभव पत्करवा लागला. यानंतर, बी. साई प्रणीत (एकेरी), बी. सुमीत रेड्डी - सात्विकसैराज रैंकीरेड्डी (दुहेरी) आणि सौरभ वर्मा (एकेरी) यांनीही आपापली लढत गमावल्याने भारताला स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.