Indian Women compound team, Archery World Cup 2025: वेळेवर व्हिसा न मिळाल्यामुळे अमेरिकेत आयोजित यंदाच्या सत्रातील तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात भारताचा कंपाउंड तिरंदाजी संघ सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे खेळाडूंना पदकापासून वंचित राहावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने २०२४ ला सर्व तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. संघाचे प्रशिक्षक जीवनज्योतिंग तेजा जांनी सांगितले की, आदिती स्वामी, मधुरा धामणगावकर आणि तनिपर्थी चिकीथा यांना वेळेवर व्हिसा न मिळाल्याने फ्लोरिडाच्या ऑवर्नडेल येथे स्पर्धेत सहभागी होता आले नाही, तेजा स्वतः देखील अमेरिकेला जाऊ शकले नाहीत.
महिला गटात पदक जिंकण्याची शंभर टक्के खात्री होती, असे सांगून तेजा म्हणाले, 'आम्ही शांघाय, इंचियोन आणि अंताल्या येथे मागच्या वर्षी तिन्ही सुवर्णपदके जिंकली. व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने यंदा पदकांचा बचाव करू शकलो नाही, भारतीय तिरंदाजी महासंघाने तीन महिन्यांपूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. क्रीडा मंत्रालयाने दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर ८ एप्रिलला व्हिसा मिळाला, तोपर्यंत कंपाउंड स्पर्धा सुरू झाली होती.
२३ खेळाडूंचे पथक
भारताने या स्पर्धेसाठी २३ खेळाडूंचे पथक निवडले होते. त्यात खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा समावेश होता, वारंवार विनंती केल्यानंतरही केवळ १४ जणांना व्हिसा मंजूर करण्यात आला. जे नऊ जण राहिले, त्यांतील दोघांना व्हिसा नाकारण्यात आला, तर ज्यांना ८ एप्रिलला व्हिसा मिळाला, त्या खेळाडूंची स्पर्धा सुरू झालेली होती. त्यामुळे त्यांना पाठविण्यात अर्थ नसल्याने विमानाची तिकिटे रह करावी लागली.
पुरुष संघाने जिंकले कांस्य
या स्पर्धेत अभिषेक वर्मा, ऋषभ यादव आणि ओजस देवतळे यांचा समावेश असलेल्या भारतीय कंपाउंड संघाने कांस्य जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. भारताने डेन्मार्कवर २३० वि. २२३ अशा गुणफरकाने मात केली. त्याआधी भारतीय संघाने ग्वॉटेमालाचा २२० वि. २१८ असा पराभव केला, पण, उपांत्य फेरीत इटलीकडून पराभवाचा धक्का बसला.