भारतीय महिला तिरंदाजी संघ आॅलिम्पिकसाठी पात्र
By Admin | Updated: July 29, 2015 02:31 IST2015-07-29T02:31:19+5:302015-07-29T02:31:19+5:30
तिरंदाजीमध्ये भारतीय महिला रिकर्व संघ रियो आॅलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरला पण, पुरुष संघाला मात्र तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगली आघाडी मिळविल्यानंतरही पराभवाला सामोरे

भारतीय महिला तिरंदाजी संघ आॅलिम्पिकसाठी पात्र
कोपेनहेगन : तिरंदाजीमध्ये भारतीय महिला रिकर्व संघ रियो आॅलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरला पण, पुरुष संघाला मात्र तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगली आघाडी मिळविल्यानंतरही पराभवाला सामोरे जावे लागले.
सातवे मानांकन प्राप्त जर्मनीविरुद्ध १-३ ने पिछाडीवर असताना भारताच्या दीपिका कुमारी, लक्ष्मी राणी मांझी व रिमिल बुरिउली यांनी चमकदारी कामगिरी करीत ५-३ ने विजय साकारला. भारतीय महिला संघाने अंतिम आठमध्ये स्थान मिळविताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
राहुल बॅनर्जी, मंगल सिंग चम्पिया व जयंत तालुकदार यांच्यासारख्या अनुभवी तिरंदाजांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाला इटलीविरुद्ध ४-२ अशी आघाडी असताना २६-२९ ने पराभव स्वीकारावा लागला. बॅनर्जी, तालुकदार आणि चम्पिया यांचा अंतिम ३२ मध्ये समावेश असल्यामुळे त्यांना वैयक्तिक कोटा स्थान मिळविण्याची संधी आहे.पोर्णिमा महतो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महिला संघाने चमकदार कामगिरी केली. जर्मनीच्या करिना विंटर, एलेना रिचटर व लीसा उनरू यांनी पहिला सेट ५९-४६ ने जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने दुसरा सेट जिंकत बरोबरी साधली. जर्मनीने तिसरा सेट ५१-५० ने जिंकला. भारतीय संघाने निर्णायक सेटमध्ये ५३-५२ ने सरशी साधताना आॅलिम्पिक प्रवेश निश्चित केला. आता दहावे मानांकन प्राप्त भारतीय संघाला कोलंबियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)