‘रोड डू लंडन’साठी भारतीय संघ सज्ज
By Admin | Updated: August 5, 2015 23:32 IST2015-08-05T23:32:56+5:302015-08-05T23:32:56+5:30
इंग्लंड येथे रंगणाऱ्या राष्ट्रीय ग्रास कोर्ट स्पर्धेसाठी भारताचा ज्युनियर टेनिस संघ आज रवाना होणार असून त्यांच्यासमोर गतस्पर्धेतील यशस्वी

‘रोड डू लंडन’साठी भारतीय संघ सज्ज
नवी दिल्ली : इंग्लंड येथे रंगणाऱ्या राष्ट्रीय ग्रास कोर्ट स्पर्धेसाठी भारताचा ज्युनियर टेनिस संघ आज रवाना होणार असून त्यांच्यासमोर गतस्पर्धेतील यशस्वी कामगिरी कायम राखण्याचे आव्हान असेल. गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत भारताने दोन विजेतेपदांवर कब्जा केला होता.
१० ते १५ आॅगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत सचित शर्मा आणि शशांक तीर्थ यांच्यावर मुलांच्या गटात मदार असेल. तर महेक जैन आणि प्रिंकल सिंग मुलींच्या गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करतील. रोड टू विम्बल्डन २०१५ च्या स्पर्धेत या चारही खेळाडुंनी अंतिम खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना राष्ट्रीय ग्रास कोर्ट या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी स्वत:ला पात्र ठरवले.
दरम्यान सध्या आयटिएफ विश्व ज्युनियर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महेक आणि प्रिंकल झेक प्रजासत्ताक येथे असून या दोघीही येथूनच थेट लंडनला पोहचतील. आॅल इंडिया टेनिस असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलींच्या प्रशिक्षिका अंकिता भांबरी यांच्यासह सचित आणि शशांक स्पर्धेसाठी रवाना होतील. (वृत्तसंस्था)