विश्व हॉकी लीगसाठी भारतीय संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2015 01:31 IST2015-05-27T01:31:37+5:302015-05-27T01:31:37+5:30

बेल्जियममधील एंटवर्पमध्ये २० जून ते ५ जुलै या कालावधीत आयोजित विश्व लीग सेमीफायनलसाठी भारताने मंगळवारी १८ सदस्यांचा समावेश असलेल्या पुरुष हॉकी संघाची घोषणा केली.

The Indian team announced for the World Hockey League | विश्व हॉकी लीगसाठी भारतीय संघ जाहीर

विश्व हॉकी लीगसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : बेल्जियममधील एंटवर्पमध्ये २० जून ते ५ जुलै या कालावधीत आयोजित विश्व लीग सेमीफायनलसाठी भारताने मंगळवारी १८ सदस्यांचा समावेश असलेल्या पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. ड्रॅग फ्लिकर रुपिंदरपाल सिंग व मिडफिल्डर उथप्पासह चार प्रमुख खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
रुपिंदर व उथप्पा यांच्या व्यतिरिक्त स्ट्रायकर मनदीप सिंग व सतबीर सिंग यांना वगळण्यात आले. या चारही खेळाडूंना गेल्या महिन्यात मलेशियातील इपोहमध्ये खेळल्या गेलेल्या अजलन शाह कप व त्यानंतर जपानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले होते. भारतीय संघ अजलन शाह कप स्पर्धेत तिसऱ्या स्थानी होता, तर जपानविरुद्धच्या मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवला होता. बचाव फळीतील जसजितसिंग कुलार व गुरमेल सिंग, मिडफिल्डर ललित उपाध्याय व स्ट्रायकर युवराज वाल्मीकी यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
जपानविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने चाचणी घेताना २४ खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची निवड केली होती. त्यात गुरमेल, जसजित, ललित व युवराज यांचा समावेश होता.
आतापर्यंत २१६ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा मिडफिल्डर सरदार सिंगला कर्णधारपदी कायम राखण्यात आले आहे तर गोलकिपर पी.आर. श्रीजेशची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली.
हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये १० संघांचा समावेश आहे. सहभागी संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली असून ‘अ’ गटात भारतासह फ्रान्स, पोलंड, परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान व बलाढ्य आॅस्ट्रेलिया या संघाचा समावेश आहे. ‘ब’ गटात चीन, आयर्लंड, ब्रिटन व यजमान बेल्जियम हे संघ आहे. भारताची सलामी लढत २० जून रोजी फ्रान्सविरुद्ध होणार आहे.
आॅलिम्पिकसाठी यापूर्वीच पात्रता गाठणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील व प्रतिस्पर्धी संघांपुढे आव्हान निर्माण करतील, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वान ऐस यांनी व्यक्त केला आहे.
ऐस म्हणाले, ‘संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. नुकत्याच जपानविरुद्धच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवत भारतीय संघाने आत्मविश्वास उंचावलेला असल्याचे सिद्ध केले आहे. भारताला आता बलाढ्य संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असून, खेळाडू व्यूहरचनेवर भर देत आहेत. भारताला कठीण गट मिळाला असला तरी खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संघ उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

भारतीय संघ
गोलकिपर : पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योत सिंग. बचाव फळी : मनप्रीत सिंग, बीरेंद्र लाकडा, कोठाजित सिंग, वी. आर. रघुनाथ, जसजित सिंग, गुरमेल सिंग. मधली फळी : गुरबाज सिंग, धरमवीर सिंग, सरदार सिंग (कर्णधार), चिंगलेनसना सिंग, ललित उपाध्याय. आघाडीची फळी : एस. व्ही. सुनील, निक्किन थिम्मया, युवराज वाल्मीकी, आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग.

Web Title: The Indian team announced for the World Hockey League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.