भारतीय फ्रँचायसी पुन्हा व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये
By Admin | Updated: March 2, 2017 00:17 IST2017-03-02T00:17:46+5:302017-03-02T00:17:46+5:30
प्रशासकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाल्यानंतर २०१२मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमधील फ्रँचायसीचे अधिकार भारताने गमावले होते.

भारतीय फ्रँचायसी पुन्हा व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये
नवी दिल्ली : प्रशासकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाल्यानंतर २०१२मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमधील फ्रँचायसीचे अधिकार भारताने गमावले होते. ते पुन्हा बहाल करण्यात येतील, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे (आयबा) अध्यक्ष डॉ. चिंग कुओ यांनी बुधवारी येथे केली.
भारतात पहिल्यांदा आयबा आयोगाची दोन दिवसांची बैठक आज संपली. त्यानंतर कुओ म्हणाले, की भारताला विश्व संस्थेत चांगले प्रतिनिधित्व दिले जाईल. भारताकडे २०११-१२ या कालावधीत मुंबई फायटर्स या फ्रँचायसीचे अधिकार होते; पण राष्ट्रीय महासंघाकडून पाठिंबा मिळत नसल्याचे कारण देऊन फ्रँचायसी मालक ट्रान्सटेडियाने माघार घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी पुन्हा फ्रँचायसी खरेदी करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे भारत यंदा डब्ल्यूएसबीच्या कक्षेत दाखल होईल.
भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अजयसिंग चौटाला यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘या निर्णयानंतर भारताचे आणखी बॉक्सर व्यावसायिक रिंगणात उतरणार आहेत.’’ याआधी २००६मध्ये विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या वेळी डॉ. कुओ भारत दौऱ्यावर आले होते. ते पुढे म्हणाले, ‘‘भारत पुन्हा व्यावसायिक रिंगणात आल्यानंतर डब्ल्यूएसबी भक्कम होईल.’’ व्यावसायिक बॉक्सरना आॅलिम्पिकमध्ये पाठविण्यासंदर्भात विचारताच ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक बॉक्सरना आॅलिम्पिकमध्ये पाठविण्याचे अधिकार आयबाने सर्वच राष्ट्रीय महासंघांना दिले आहेत.’’
भारत नोव्हेंबर महिन्यात विश्व युवा बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक आहे. भारताला विविध समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम आयबा करणार आहे.