रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय भोजन
By Admin | Updated: July 6, 2016 19:36 IST2016-07-06T19:36:30+5:302016-07-06T19:36:30+5:30
पुढील महिन्यात आयोजित रिओ आॅलिम्पिकदरम्यान भारतीय खेळाडूंना क्रीडाग्राममध्ये भारतीय भोजनाचा आनंद घेता येईल

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय भोजन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ : पुढील महिन्यात आयोजित रिओ आॅलिम्पिकदरम्यान भारतीय खेळाडूंना क्रीडाग्राममध्ये भारतीय भोजनाचा आनंद घेता येईल. काही खेळाडूंनी भारतीय भोजनाची मागणी केली असल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने बुधवारी दिली.
क्रीडा सचिव राजीव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजकांनी भारतीय खेळाडूंना त्यांच्या आवडीचे भोजन उपलब्ध करून देण्याविषयी आश्वासन दिले आहे. भारतीय भोजन अधिकृत मेन्यूचा भाग राहणार आहे. खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी आवडीचे भोजन मिळण्याची गरज असल्याचे मत अनेक भारतीय खेळाडूंनी व्यक्त करीत भारतीय भोजन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. भारतीय आॅलिम्पिक समितीने ही मागणी आयोजन समितीकडे करताच ती मान्य करण्यात आली.
भारतीय खेळाडूंनी रिओमध्ये पाय ठेवताच त्यांना दैनिक भत्ता मिळणे सुरू होईल. ही रक्कम दररोज १०० डॉलर इतकी राहील. आधीची ५० डॉलर ही रक्कम पुरेशी नसल्याची तक्रार काही खेळाडूंनी केली होती. भारताने आतापर्यंतचे सर्वांत मोठे १०० पेक्षा अधिक खेळाडूंचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पदकांची भविष्यवाणी करणे कठीण असले तरी पदकांची संख्या दुहेरी
आकड्यात असेल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली होती.