भारतीय मुलांकडून स्पोर्टफ्रेयुंडे पराभूत
By Admin | Updated: August 1, 2016 05:44 IST2016-08-01T05:44:38+5:302016-08-01T05:44:38+5:30
कोमलने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाने जर्मनीच्या स्पोर्टफ्रेयुंडे सिजेन एफसी संघाला ५-० असे लोळवले.

भारतीय मुलांकडून स्पोर्टफ्रेयुंडे पराभूत
नवी दिल्ली : कोमलने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाने जर्मनीच्या स्पोर्टफ्रेयुंडे सिजेन एफसी संघाला ५-० असे लोळवले. उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीयांनी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे दबावाखाली ठेवले.
कोमलच्या आक्रमक खेळाला अमन छेत्री, नरेंद्र आणि रकीप यांनी प्रत्येकी एक गोल करत शानदार साथ दिली. विशेष म्हणजे स्पोर्टफ्रेयुंडे संघाने तिसऱ्याच मिनिटाला कॉर्नर किक मिळवली होती. मात्र, या वेळी अमरजितने जबरदस्त बचाव करताना स्पोर्टफ्रेयुंडे संघाला गोल करण्यापासून दूर ठेवले. यानंतर १४व्या मिनिटाला रकीपने केलेल्या पासवर कोणतीही चूक न करता कोमलने गोल करून भारताला आघाडीवर नेले.
यानंतर अर्ध्या तासाने अमन छेत्रीने दुसरा गोल करून भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पुन्हा एकदा भारतीयांनी आक्रमक पवित्रा घेत वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. त्यात, कोमलने वैयक्तिक दुसरा गोल करताना भारताला ३-० असे आघाडीवर नेले. यानंतर चारच मिनिटांनी नरेंद्रने गोल केला. तर, सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना रकीपने संघाचा पाचवा गोल केला.
(वृत्तसंस्था)