भारतीय फलंदाजी केविलवाणी भासली !
By Admin | Updated: November 25, 2015 23:41 IST2015-11-25T23:41:47+5:302015-11-25T23:41:47+5:30
दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कशी केविलवाणी स्थिती झाली हे जामठा स्टेडियमवर पहायला मिळाले.

भारतीय फलंदाजी केविलवाणी भासली !
किशोर बागडे, नागपूर
दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कशी केविलवाणी स्थिती झाली हे जामठा स्टेडियमवर पहायला मिळाले. मुरली विजयचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांच्या खेळण्यात आक्रमकता व मोठी खेळी करण्याचा निर्धार दिसलाच नाही.
कर्णधार विराट कोहलीचे फलंदाजी तंत्र दोषपूर्ण दिसले, तर मधल्या फळीचा आधार असलेला अजिंक्य रहाणे सपशेल अपयशी ठरला. राहुल द्रविडची उणीव तो भरून काढेल, असा अनेकांचा समज असेल, पण त्यानेही घोर निराशा केली. सलामीवीर शिखर धवनचे बरेच बरे आहे. एकापाठोपाठ एका सामन्यात तो सातत्याने अपयशी ठरत असून, आजही ढेपाळला. रोहित शर्मा हादेखील संघाच्या मदतीला धावून येऊ शकला नाही.
भारतीय फलंदाजांची एकूणच कामगिरी अपेक्षेनुरूप नव्हती. अवघ्या २१५ धावा निघाल्या आणि त्यातही मुरली विजय खेळला म्हणून. मुरली चांगल्या चेंडूवर बाद झाला; पण अन्य फलंदाजांचे काय? अनेकजण नको त्या चुका करीत परतले. याचे कारण आत्मविश्वासाचा अभाव, असे म्हणावे लागेल. आत्मविश्वास असता तर अशा चेंडूला छेडण्याची चूक घडली नसती.
विजय धावा काढत आहे व उत्तम फॉर्ममध्ये असल्याने आॅफ स्टम्पबाहेर जाणारा चेंडू न खेळण्याचा निर्णय घेऊ शकला. जामठ्याची खेळपट्टी केवळ फिरकीला अनुकूल ठरली असे म्हणणे चुकीचे ठरेल. ती वेगवान माऱ्यालाही पूरक होती. मोर्केल आणि रबाडा यांनी त्यामुळेच कमाल केली. भारतीय गोलंदाजांनादेखील संधी असल्याने २१५ धावा अपुऱ्या नाहीत. या आव्हानात्मक धावांचा बचाव करण्याची वेळ आता गोलंदाजांची आहे. कसोटीचा पहिला आणि दुसरा दिवस साधारणत: फलंदाजांसाठी अनुकूल मानला जातो, पण येथे पहिल्याच दिवशी भारताचा डाव संपला. भारतीय गोलंदाज आज, गुरुवारी आफ्रिकेला गुंडाळू शकले तर सामन्याचा निकाल तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मैदानावर उपस्थित प्रेक्षक आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या ओठावर सामन्याचा निकाल किती दिवसांत येऊ शकतो याचीच चर्चा रंगली होती.
निकाल देणारी खेळपट्टी
नागपूर : मोहालीमध्ये कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यानंतर खेळपट्टीबाबत चर्वितचर्वण सुरू झाले. दक्षिण आफ्रिकेचा आॅफ स्पिनर सिमोन हार्मरनेही भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या सूरात सूर मिसळताना आधुनिक क्रिकेटमध्ये निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये हार्मर पत्रकार परिषदेत बोलत होता. हार्मर म्हणाला, ‘पाच दिवस खेळ चालावा या उद्देशाने खेळपट्ट्या तयार करण्यात येत नाही. कारण निकाल मिळण्याच्या उद्देशाने खेळपट्ट्या तयार करण्यात येतात. ज्यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतो त्यावेळी आम्ही आमच्या गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या तयार करतो. केवळ एका वेगवान गोलंदाजाला संधी दिल्यामुळे खेळपट्टी कशी असेल, याची कल्पना आली.’