भारतीय तिरंदाज कांस्यपदक प्ले आॅफमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:54 IST2017-08-12T00:54:48+5:302017-08-12T00:54:48+5:30
भारतीय पुरुष कंपाऊंड संघ येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्व चषकाच्या चौथ्या पर्वात अद्यापही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे; परंतु दुसरीकडे रिकर्व्ह गटात सर्वच तिरदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू आहे.

भारतीय तिरंदाज कांस्यपदक प्ले आॅफमध्ये
बर्लिन : भारतीय पुरुष कंपाऊंड संघ येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्व चषकाच्या चौथ्या पर्वात अद्यापही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे; परंतु दुसरीकडे रिकर्व्ह गटात सर्वच तिरदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि अमनजितसिंह या पाचव्या मानांकित भारतीय त्रिकुटाने स्पेनला २२८-२२२ असे पराभूत करीत विजयी सुरुवात केली आणि उपांत्यपूर्व फेरीत १३ व्या मानांकित स्वीडनवर २३१-२२९ असा विजय मिळवला.
तथापि, भारतीय संघाला अमेरिकेविरुद्ध २२८-२३३ असा पराभव पत्करावा लागला. भारत आता कांस्यपदकासाठी शनिवारी होणाºया लढतीत कमी रँकिंग असणाºया जर्मनीशी दोन हात करेल.
ज्योती सुरेखा वेनाम, तृषा देब आणि स्नेहल मंडारे यांचा समावेश असलेल्या तृतीय मानांकित भारतीय कंपाऊंड महिला संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला. त्यामुळे ते उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले. तथापि, भारतीय संघाला अंतिम आठमध्ये ११ व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेकडून शूटआॅफमध्ये २८-२९ असा निसटता पराभव पत्करावा लागला. कंपाऊंड मिश्रित संघदेखील उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिकोकडून ?१४९-१५६ ने पराभूत झाला.
कंपाऊंडच्या वैयक्तिक गटात केवल वर्मा आणि ज्योती हेच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकले, तर अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.