भारत विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये

By Admin | Updated: July 19, 2015 22:19 IST2015-07-19T22:19:56+5:302015-07-19T22:19:56+5:30

सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांनी रविवारी आशिया ओशियाना ग्रुप एक डेव्हिस कप लढतीत न्यूझीलंडविरुद्ध परतीच्या एकेरीच्या

India in World Group Play Af | भारत विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये

भारत विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये

ख्राईस्टचर्च : सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांनी रविवारी आशिया ओशियाना ग्रुप एक डेव्हिस कप लढतीत न्यूझीलंडविरुद्ध परतीच्या एकेरीच्या लढतीत सरशी साधली आणि ३-२ ने विजयासह भारताला विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करून दिले.
युकीने कारकिर्दीत प्रथमच निर्णायक पाचव्या लढतीत सरशी साधताना भारताला विजयाचे ‘गिफ्ट’ दिले. युकीने मायकल व्हीनसचा ६-२, ६-२, ६-३ ने पराभव केला, तर त्याआधी सोमदेवने आजच्या पहिल्या लढतीत मार्क्स डॅनियलविरुद्ध ६-४, ६-४, ६-४ ने विजय मिळवला.
सोमदेव आज पहिल्या लढतीसाठी मैदानावर दाखल झाला त्या वेळी भारतासाठी ‘करा अथवा मरा’अशी स्थिती होती. भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू असलेल्या सोमदेवने निराश न करता विजय मिळवत संघाच्या आशा कायम राखल्या. कारकिर्दीत केवळ दुसऱ्यांदा पाचव्या व निर्णायक लढतीत खेळताना युकीने व्हीनसविरुद्ध वर्चस्व कायम राखत सहज विजयाची नोंद केली. व्हीनसने यापूर्वी पहिल्या लढतीत सोमदेवचा पराभव करताना धक्कादायक निकाल नोंदवला होता. दिल्लीचा २३ वर्षीय टेनिसपटू युकी भारताच्या विजयाचा ‘हिरो’ ठरला. त्याने एकेरीच्या दोन्ही लढती जिंकल्या. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बंगळुरूमध्ये सर्बियाच्या फिलिप क्राजिनोव्हिचविरुद्ध निर्णायक पाचव्या लढतीत युकीला पराभव स्वीकारावा लागला होता.
आज युकीने व्हीनसवर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटच्या सहाव्या गेमपर्यंत त्याला ब्रेक पॉर्इंटला सामोरे जावे लागले नाही. युकीने पहिल्या दोन सेटमध्ये प्रत्येकी दोनदा व्हीनसची सर्व्हिस भेदताना २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये व्हीनसने थोडाफार प्रतिकार केला. युकीविरुद्ध त्याने सहाव्या गेममध्ये ब्रेकपॉर्इंट मिळवला होता; पण भारतीय
खेळाडूने त्याला यश मिळू दिले नाही. युकीने आठव्या गेममध्येही दोन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला आणि
आपल्या सर्व्हिसवर तिसऱ्या मॅच पॉर्इंटवर गुण वसूल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारत आता सप्टेंबर महिन्यात प्ले आॅफमध्ये सहभागी होताना विश्व ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याआधी, सोमदेवने भारताला चांगली सुरुवात करून दिली. सर्दी व ज्वराने पछाडलेल्या जोस स्टॅथमच्या स्थानी न्यूझीलंडने डॅनियलला संधी दिली. यजमान देशाच्या या खेळाडूला मात्र संघाला निर्णायक आघाडी मिळवून देण्यात अपयश आले. सोमदेवने आज चमकदार सुरुवात करताना पहिल्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये डॅनियलची सर्व्हिस भेदली. सोमदेवने त्यानंतर ही आघाडी कायम राखताना १० व्या गेममध्ये आपली सर्व्हिस अभेद्य राखत पहिला सेट जिंकला. दरम्यान, सहाव्या गेममध्ये सोमदेवने ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला.
डॅनियलने दुसऱ्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये दोन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला. आठव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडू आपली सर्व्हिस राखण्यात यशस्वी ठरले. सोमदेवने नवव्या गेममध्ये डॅनियलची सर्व्हिस भेदताना ५-४ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर आपली सर्व्हिस कायम राखत २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला सोमदेवला दोन ब्रेक पॉर्इंट मिळाले होते, पण डॅनियलने याचा बचाव केला. पाचव्या गेममध्ये सोमदेवला आणखी एकदा ब्रेकची संधी मिळाली. या वेळी डॅनियलने दुहेरी चूक करीत भारतीय खेळाडूला ‘ब्रेक’चे गिफ्ट दिले. सोमदेवने त्यानंतर गेममध्ये आपली सर्व्हिस गमावली, त्यामुळे स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता. सोमदेवने नवव्या गेममध्ये पुन्हा एकदा डॅनियलची सर्व्हिस भेदली आणि आपली सर्व्हिस कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. सोमदेवच्या विजयामुळे भारताने या लढतीत २-२ अशी बरोबरी साधली.
नवी दिल्ली : सर्बियाविरुद्ध गेल्या लढतीत निर्णायक पाचवा सामना गमाविल्यामुळे युकी भांबरी टीकाकारांचे लक्ष्य ठरला होता, पण या वेळी न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक लढतीत सरशी साधत भारताला डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये स्थान मिळवून देत युकीने ते अपयश धुवून काढले.
या दोन्ही सामन्यांत निर्णायक लढतींमध्ये युकीचे प्रतिस्पर्धी फिलिप क्राजिनोव्हिच (सप्टेंबर २०१४) व मायकल व्हीनस यांचा दर्जा चर्चेचा विषय ठरू शकतो, पण निर्णायक लढतीत असलेले दडपण झुगारण्यात युकी यशस्वी ठरला, हे सत्य मात्र नाकारता येत नाही.
भारत व सर्बिया यांच्यादरम्यानची लढत २-२ ने बरोबरीत होती. त्यानंतर युकीला निर्णायक लढत खेळण्याची संधी मिळाली, पण क्राजिनोव्हिचचा पराभव करण्यात तो अपयशी ठरला. युकीने विजय मिळवला असता तर भारताला विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवता आले असते.
पण, आज मात्र सर्वकाही वेगळे घडले. आज न्यूझीलंडविरुद्ध युकी भारताच्या विजयाचा ‘हीरो’ ठरला. पहिल्या दिवशी सोमदेव देववर्मनच्या पराभवामुळे भारतावर दडपण निर्माण झाले असताना युकीने एकेरीची लढत जिंकत भारताला बरोबरी साधून दिली. आज व्हीनसचा पराभव करीत पाहुण्या संघाचा विजय निश्चित केला.
आजच्या विजयानंतर सीनिअर खेळाडू रोहन बोपन्ना आणि सोमदेव यांनी २३ वर्षीय युकीचा प्रशंसा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत युकीने एकदाही सर्व्हिस गमावली नाही.
(वृत्तसंस्था)

Web Title: India in World Group Play Af

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.