अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी विजय
By Admin | Updated: January 29, 2017 23:02 IST2017-01-29T22:29:58+5:302017-01-29T23:02:36+5:30
इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे.

अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी विजय
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे. इंग्लंडची भारतानं दिलेलं 144 धावांचा पाठलाग करताना पुरती दमछाक उडाली आहे. आशिष नेहराच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहेत. नेहरानं बिलिंग्स, रॉय आणि स्ट्रोक्सला माघारी धाडून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. बुमराहनं इंग्लंडच्या रुट आणि बटलरला तंबूत पाठवून भारताचा विजय सुनिश्चित केला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी आठ धावांची गरज असतानाच बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने षटकात दोन विकेट्स घेतल्या असून, इंग्लंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना बुमराहने फलंदाजांना संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-20 मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराहला 'मॅन ऑफ द मॅच' या किताबानं गौरविण्यात आलं आहे.
इंग्लंडच्या स्ट्रोक्सनं 27 चेंडूंत 2 षटकारांसह 2 चौकार लगावत 38 धावांची खेळी करून इंग्लंडच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. भारताकडून लोकेश राहुलने एकाकी झुंज देताना 71 धावा फटकावल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने यजमान संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रैना (7) आणि युवराज सिंग (4) हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर राहुल (71) आणि मनीष पांडे (30) यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करत संघाला 100 पार पोहोचवले.