Women’s Asia Cup Hockey 2025 : भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप २०२५ स्पर्धेतील सलामीच्या लढतीत दिमाखदार विजय नोंदवला आहे. चीनमधील हांगझोऊच्या गोंगशू जिल्ह्यातील कॅनॉल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर 'ब' गटातील भारत विरुद्ध थायलंड यांच्यातील सामना खेळवण्यात आला. भारतीय महिला हॉकी संघाने ११- ० असा धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारतीय महिला हॉकी संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत दिग्गज गोलकीपर सविता पुनिया आणि ड्रॅग फ्लिकर दीपिका शिवाय मैदानात उतरला आहे. दोघीही दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय महिला संघाने मिळवलेला विजय आणखी मोठा आणि महत्त्वपूर्ण ठरतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या दोघींनी प्रत्येकी २-२ गोल डागले, तर...
भारतीय महिला हॉकी संघाकडून उदिता दुहान आणि ब्यूटी डुंग डुंग या दोघींनी प्रत्येकी २-२ गोल डागले. उदिताने ३० व्या आणि ५२ व्या मिनिटांत पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतरित केले. डुंग डुंग हिने ४५ व्या आणि ५४ व्या मिनिटात संघासाठी दोन गोल डागले. मुमताज खान हिने संघाला ७ व्या मिनिटाला खाते उघडून दिले. अवघ्या काही वेळातच संगीता कुमारी हिने १० व्या मिनिटाला गोल डागत ही आघाडी २-० अशी केली. १६ व्या मिनिटाला नवनीत कौर आणि १८ व्या मिनिटाला लालरेम्सियामी हिने गोल डागल्याचे पाहायला मिळाले. थौदाम सुमन देवी (४९ व्या मिनिटाला), शर्मिला देवी (५७ व्या मिनिटाला) आणि रुताजा पिसल यांनीही (६० व्या मिनिटा) प्रत्येकी १-१ गोल डागत संघाला मोठा विजय मिळवून देण्यात पुढाकार घेतला.
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा
पहिल्या हाफमध्ये सामना केला सेट
हॉकीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने पहिल्या पासून सामन्यावर पकड मिळवत ३० व्या क्रमांकावरील थायलंडला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला संघाने आक्रमक खेळाचा नजारा पेश करत ५-० अशी आघाडी मिळवली. इथंच भारतीय संघाने सामना आपल्या बाजूनं केला होता. शेवटर्यंत एकही गोल न करू देता भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्याला शून्यावर ठेवत स्पर्धेची सुरुवात धमाक्यात केली.
आता जपान अन् सिंगापूरविरुद्ध भिडणार
यंदाच्या हंगामातील महिला आशिया कप स्पर्धेत ८ संघ सहभागी असून दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर ४ साठी पात्र ठरणार आहेत. यातील दोन अव्वल संघ १४ सप्टेंबरला फायनल खेळतील. भारतीय संघाने पहिला सामना जिंकत सुरुवात एकदम भारी केलीये. आता शनिवारी भारतीय महिला संघासमोर जपानचे आव्हान असेल. त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात ८ सप्टेंबरला भारतीय संघ सिंगापूर विरुद्ध भिडेल.