आॅस्ट्रेलिया दौ-यात भारताला ‘क्लीन स्वीप’ मिळेल
By Admin | Updated: November 21, 2014 00:24 IST2014-11-21T00:24:28+5:302014-11-21T00:24:28+5:30
आॅस्ट्र्रेलियाविरुद्ध होणा-या आगामी मालिकेत भारताला यजमान संघाकडून ०-४ ने क्लीन स्वीप मिळणार असल्याचे भाकीत माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याने वर्तविले आहे.

आॅस्ट्रेलिया दौ-यात भारताला ‘क्लीन स्वीप’ मिळेल
सिडनी : आॅस्ट्र्रेलियाविरुद्ध होणा-या आगामी मालिकेत भारताला यजमान संघाकडून ०-४ ने क्लीन स्वीप मिळणार असल्याचे भाकीत माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याने वर्तविले आहे.
सिडनी हेरॉल्डला दिलेल्या मुलाखतीत मॅक्ग्रा म्हणतो, ‘आम्ही २०११-१२ च्या मालिकेत आॅस्ट्रेलियात भारताला ४-० ने लोळविले होते. यंदा अशीच स्थिती राहील आणि भारताला ०-४ ने पराभूत व्हावे लागेल.’ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कचा खराब फॉर्म आणि खराब फिटनेसशिवाय पाकविरुद्धची त्याची कुचकामी कामगिरी विचारात घेतली, तरीही महेंद्रसिंह धोनीचा संघ आमच्या संघाच्या तुलनेत कमुकवत ठरेल, असेही मॅक्ग्राचे मत आहे. उभय संघांदरम्यान पुढील महिन्यात ब्रिस्बेन येथे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. मॅक्ग्रा म्हणाला, ‘गेल्या मोसमात आॅस्ट्रेलिया संघाची कामगिरी देखणी झाली. या कामगिरीची पुनरावृत्ती झाली, तरी भारताला आम्ही सहज नमवू शकतो.’
भारताचे विदेशातील रेकॉर्ड खराब आहे. याकडे लक्ष वेधताना मॅक्ग्रा पुढे म्हणाला, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर नेहमीच अपयशी ठरला आहे. विदेशात भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. १९८५ पासून भारताने आॅस्ट्रेलियात २३ पैकी केवळ दोन कसोटी सामने जिंकले. भारताने जे सामने जिंकले त्या वेळी सचिन, द्रविड आणि लक्ष्मण हे संघात होते. सध्याच्या भारतीय संघात त्यांच्या तोडीचा कुणीही फलंदाज नाही.’ मॅक्ग्रा सध्या चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये नव्या दमाच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देत आहे.
मॅक्ग्राने कारकीर्दीत १२४ सामन्यांत ५६३ कसोटी बळी घेतले असून, २५० वन डेत ३८१ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)