भारत करणार युवा आॅलिम्पिक, आशियाड, आॅलिम्पिकची दावेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:26 IST2018-04-20T00:26:57+5:302018-04-20T00:26:57+5:30
भारत वरील तिन्ही स्पर्धांची दावेदारी सादर करेल. यजमानपद मिळो वा न मिळो पण आम्ही दावेदारी सादर करणार आहोत.

भारत करणार युवा आॅलिम्पिक, आशियाड, आॅलिम्पिकची दावेदारी
नवी दिल्ली : भारत २०२६ चे युवा आॅलिम्पिक, २०३० च्या आशियाड आणि २०३६ च्या आॅलिम्पिक आयोजनाची दावेदारी सादर करणार असल्याची माहिती भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली.
बत्रा यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती प्रमुख थॉमस बाक आणि आशियाई आॅलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल सबाह यांची गुरुवारी भेट घेतली. या तिन्ही प्रमुखांमध्ये आयोजनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
पत्रकारांना बैठकीची माहिती देताना बत्रा म्हणाले, ‘भारत वरील तिन्ही स्पर्धांची दावेदारी सादर करेल. यजमानपद मिळो वा न मिळो पण आम्ही दावेदारी सादर करणार आहोत.’ भारताने याआधी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाड आणि फिफा अंडर १७ फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले आहे.
भारताच्या दावेदारीवर आश्वासन देण्याचे थॉमस बाक यांनी टाळले. ते म्हणाले,‘ भारतात आयोजन क्षमता आहे असे मी सांगू इच्छितो. भारताला एक ना एक दिवस आॅलिम्पिकचे यजमानपद मिळेल. सध्या या स्पर्धेबाबत दावेदारी सुरु झाली नसल्याने काही भाष्य करणे व्यर्थ आहे.’
आॅलिम्पिक यजमानपदासंदर्भात ते म्हणाले, ‘२०२८ चे आॅलिम्पिक यजमानपद निश्चित झाले आहे. पुढील संधी २०३२ मध्ये असेल. सध्या २०२६ च्या हिवाळी आॅलिम्पिकची प्रक्रिया सुरू आहे. हिवाळी आॅलिम्पिक आयोजनात भारताला सारस्य नसेल. हिवाळी आयोजनासाठी सध्या सात शहरांनी दावेदारी सादर केली आहे.’ (वृत्तसंस्था)