भारत कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील
By Admin | Updated: August 30, 2014 04:00 IST2014-08-30T04:00:08+5:302014-08-30T04:00:08+5:30
तिसरी वन-डे : दुखापतीमुळे रोहित ‘आउट’, इंग्लंड मालिकेत बरोबरी साधण्यास उत्सुक

भारत कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील
नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यास प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघाला शनिवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या लढतीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला असून त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली.
ब्रिस्टलमध्ये पहिला वन-डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता तर कार्डिफमध्ये दुसऱ्या लढतीत भारताने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
उपखंडाबाहेर प्रथमच शतक झळकाविताना ७५ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी करणारा सुरेश रैना कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. रवींद्र जडेजा गोलंदाजीमध्ये छाप सोडण्यास उत्सुक आहे. उभय संघ यापूर्वी ट्रेन्टब्रिजमध्ये खेळलेले असून तेथील खेळपट्टी योग्य नसल्याचे मत मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आयसीसीने मैदानावरील कर्मचाऱ्यांना अधिकृत ताकीद दिली होती. उभय संघातील तळाच्या फ लंदाजांनी या खेळपट्टीवर धावा वसूल केल्या होत्या. वन-डे लढतीत अशाच प्रकारची खेळपट्टी असेल तर येथे धावांचा पाऊस बघायला मिळण्याची आशा आहे. ट्रेन्टब्रिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या या लढतीच्या निमित्ताने जडेजा-अॅन्डरसन वादाची आठवण पुन्हा ताजी होईल. वन-डे क्रिकेटमध्ये भारताचे पारडे वरचढ मानल्या जाते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कसोटी मालिकेतील पराभवाची फरतफेड करण्यास उत्सुक असून त्यासाठी भारतीय संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची आहे. कार्डिफमध्ये विजय मिळवीत भारताने मालिकेत चांगली सुरुवात केली. सहापैकी चार फलंदाजांनी तेथे धावा फटकाविल्या. रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांना गवसलेला सूर भारतासाठी दिलासा देणारी बाब ठरली. रोहित दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता रहाणेच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. विराट कोहली व शिखर धवनचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. ट्रेन्टब्रिजच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी होते, याबाबत उत्सुकता आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता वन-डे सामन्यात इंग्लंडतर्फे एलेक्स हेल्स व ख्रिस व्होक्स यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना छाप सोडता आलेली नाही. वेगवान गोलंदाज जेम्स अॅन्डरसन जडेजाविरुद्धचा वाद विसरून चांगली कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहे. संघर्ष करीत असलेल्या ख्रिस जॉर्डनच्या स्थानी स्टिव्ह फिनला संधी मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)