भारताने घेतला स्टार्कचा धसका - मार्श
By Admin | Updated: March 2, 2017 20:58 IST2017-03-02T20:58:20+5:302017-03-02T20:58:20+5:30
वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा भारतीय खेळाडूंनी धसका घेणे ही आॅस्ट्रेलियाच्या जमेची बाजू असल्याचे अष्टपैलू मिशेल मार्शचे मत आहे.

भारताने घेतला स्टार्कचा धसका - मार्श
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. 02 - वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा भारतीय खेळाडूंनी धसका घेणे ही आॅस्ट्रेलियाच्या जमेची बाजू असल्याचे अष्टपैलू मिशेल मार्शचे मत आहे.
पुणे कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांना झटपट बाद करण्यात स्टार्कने मोलाची भूमिका वठविली होती. दुस-या कसोटीनिमित्त पत्रकारांशी बोलताना मार्श म्हणाला,‘स्टार्कच्या कामगिरीमुळे भारतीय खेळाडू चिंतेत असतील ही आमच्यासाठी आनंददायी बाब म्हणावी लागेल. बेंगळुरु येथेही स्टार्क प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे. तो जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज नसेल पण सर्वोत्कृष्टपैकी एक आहे. फिरकीपटूंची चर्चा होत असताना आमचा वेगवान गोलंदाज प्रमुख ‘शस्त्र’ठरतो, हे महत्त्वपूर्ण म्हणावे लागेल.’
स्टार्क-हेजलवूड या दोघांमध्ये जुन्या चेंडूने बळी घेण्याची क्षमता असल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. दोघेही भारतीय फलंदाजांना घाम फोडू शकतात. पुण्याची खेळपट्टी आमच्यासाठी पूरक ठरली. येथे असे घडेलच हे सांगता येत नाही पण ‘रिव्हर्स स्विंग’चा योग्य वापर करून भारताला पुन्हा लोळवू शकतो, असे संकेत मार्शने दिले.
मार्श बंधूंमध्ये लहान असलेल्या मिशेलने पुण्यातील खेळपट्टीवर ७६ चेंडूंचा सामना केला. २५ वर्षांचा हा खेळाडू पुढे म्हणाला,‘पुण्यासारखी परिस्थिती पुन्हा ओढवली तर आक्रमण आणि बचाव यामध्ये आम्ही वर्चस्व गाजवू शकतो.’ मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानुसार आयसीसीने पुण्याची खेळपट्टी ‘खराब’ठरविली. मार्शने मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला. तो म्हणाला,‘ही खेळपट्टी उभय संघांसाठी एकसारखीच होती. २० कसोटी खेळण्याचा मला अनुभव आहे. त्यापैकी पुण्यातील खेळपट्टी सर्वोत्कृष्ट होती इतकेच मी सांगू शकतो.