भारत अ संघाची कसोटी लागणार
By Admin | Updated: August 6, 2015 22:59 IST2015-08-06T22:59:02+5:302015-08-06T22:59:02+5:30
आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध नुकत्याच झालेल्या चार दिवसीय अनधिकृत दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारत ‘अ’ संघ आता त्रिकोणीय एकदिवसीय

भारत अ संघाची कसोटी लागणार
चेन्नई : आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध नुकत्याच झालेल्या चार दिवसीय अनधिकृत दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारत ‘अ’ संघ आता त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका ‘अ’चा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारत ‘अ’समोर शुक्रवारी बलाढ्य आॅस्टे्रलिया ‘अ’ संघाला रोखण्याचे मुख्य आव्हान असेल. भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणारा उन्मुक्त चंद याची मोठी कसोटी लागेल.
भारत दौऱ्यावर आलेल्या आॅसी संघाचे यजमानांविरुद्ध चांगले वर्चस्व राहिले असून, दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी १-० अशी बाजी मारली. यानंतर त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेतदेखील विजयी सुरुवात करताना आॅसी संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला १० विकेटनी नमविले होते.
भारतीय संघातील अनेक खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असून, मनीष पांड्ये, केदार जाधव, संजू सॅमसन, करुण नायर आणि कर्ण शर्मा यांचे या सामन्यातून राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न असतील. या स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर मुख्य राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न या खेळाडूंचा असेल. दरम्यान, दोन अनधिकृत कसोटी मालिकांत खेळलेला करुण नायर या एकमेव खेळाडूचा भारतीय संघात समावेश आहे.
गोलंदाजीमध्ये भारतीय संघ समतोल दिसत असून, संदीप शर्मा, रुश कालरा, रिषी धवन आणि धवल कुलकर्णी यांच्यावर भारतीय संघाची गोलंदाजी अवलंबून असेल. दुसऱ्या बाजूला पाहुण्या आॅसी संघाने भारतीय वातावरणात स्वत:ला चांगलेच जुळवून घेतले असून, विजयी कामगिरी कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
कर्णधार उस्मान ख्वाजा याचे नेतृत्वगुण आॅसी संघासाठी निर्णायक ठरत आहेत. एकूणच आॅसी संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ घरच्या वातावरणाचा कशा प्रकारे फायदा करून घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (क्रीडा प्रतिनिधी)