भारताचा मालिका विजय
By Admin | Updated: November 9, 2014 23:26 IST2014-11-09T23:26:53+5:302014-11-09T23:26:53+5:30
चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पर्थच्या हॉकी स्टेडियमवर रविवारी यजमान आॅस्ट्रेलियाला ३-१ असे लोळवून इतिहासाची नोंद केली

भारताचा मालिका विजय
पर्थ : चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पर्थच्या हॉकी स्टेडियमवर रविवारी यजमान आॅस्ट्रेलियाला ३-१ असे लोळवून इतिहासाची नोंद केली. या विजयाबरोबर भारताने ही मालिका ३-१ अशी खिशात टाकली. या विजयात आकाशदीप सिंहने दोन, तर एसके उथप्पा याने एक गोल करून मोलाची भूमिका बजावली. २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार सरदार सिंगकरिता हा विजय अविस्मरणीय राहिला.
गेल्या दोन लढतीत अप्रतिम खेळ करणाऱ्या भारतीय संघाने यजमानांवर सुरुवातीपासून दडपण आणले होते. सामन्याच्या १३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर आकाशदीपने कोणतिही चुक न करता भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये ती कायम राखली. दुसऱ्या हाफमध्ये आॅस्ट्रेलियाकडून कडवे उत्तर मिळाले. थॉमस क्रेग याने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. या बरोबरीनंतर सामन्यातील चुरस आणखीनच वाढली. ५०व्या मिनिटाला भारताकडून आॅसींना सडेतोड उत्तर मिळाले. आकाशदीपने फिल्ड गोल करून लढत २-१ अशी भारताच्या बाजूने झुकवला. या धक्क्यापासून सावरण्याआधीच ५३व्या मिनिटाला एस के उथप्पा याने गोल करून भारताची आघाडी ३-१ अशी मजबूत केली. अखेरच्या काही मिनिटांत आॅस्ट्रेलियाने आक्रमणात भर केली, परंतु भारताचा गोलकिपर पी आर श्रीजेश याने ते हाणुन पाडले. अखेर भारताने ३-१ असा विजय निश्चित करून मालिका खिशात टाकली.