आव्हानांसाठी भारत सज्ज !
By Admin | Updated: December 5, 2014 23:57 IST2014-12-05T23:57:57+5:302014-12-05T23:57:57+5:30
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा आणि जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला भारतीय हॉकी संघ फॉर्म कायम राखत उद्या,

आव्हानांसाठी भारत सज्ज !
भुवनेश्वर : आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा आणि जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला भारतीय हॉकी संघ फॉर्म कायम राखत उद्या, शनिवारी येथे जर्मनीविरुद्ध चॅम्पियन ट्रॉफीतील अभियानाचा सुरुवात करेल. याचवर्षी भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते आणि त्यापाठोपाठ आॅस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. याच कामगिरीत सातत्य राखण्यासह अव्वल संघांना पराभूत करण्याच्या आव्हानांसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
सराव सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाला पराभूत केल्यामुळे भारताचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. त्यामुळेच ग्रुप ‘ब’मधील पहिल्याच लढतीत जर्मनीला नमवून विजयी सलामी देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून, ‘ब’ गटात भारतासह हॉलंड, जर्मनी आणि अर्जेंटिना हे तगडे संघ आहेत.
‘अ’ गटात गतविजेता आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. गत चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. परंतु, सरदार सिंग याच्या नेतृत्वाखाली भारताने कामगिरीचा आलेख चढता ठेवला आहे. आॅस्ट्रेलियात चार सामन्यांच्या मालिकेत भारताने यजमानांना ३-१ असे लोळवले होते आणि अभ्यास सामन्यातही त्यांनी २-० असा दणदणीत विजय साजरा केला.
जर्मनीविरुद्धच्या लढतीत कर्णधार सरदारसह गोलकिपर पी. श्रीजेश याची भूमिका महत्त्वाची असेल. आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीजेशने पाकिस्तानला नमविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारताला जर्मनीनंतर अर्जेंटिना आणि हॉलंड यांच्याशी अनुक्रमे सात व नऊ डिसेंबरला सामना करावा लागेल. फिटनेस व्यतिरिक्त भारतासमोर आव्हान असेल ते पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात येत असलेले अपयश. या विभागात भारतीय संघ कमकुवत असल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडे अल्पसा कालावधी आहे. असे असले तरी रघुनाथ आणि रुपिंदर यांनी गेल्या काही सामन्यांत या विभागावर तोडगा काढला आहे. (वृत्तसंस्था)