भारत विजयाच्या मार्गावर

By Admin | Updated: August 3, 2016 04:09 IST2016-08-03T04:09:48+5:302016-08-03T04:09:48+5:30

भारताने विंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला डाव ९ बाद ५०० धावांवर घोषित करून ३०४ धावांची मजबूत आघाडी घेतली.

India on the path of victory | भारत विजयाच्या मार्गावर

भारत विजयाच्या मार्गावर


किंग्स्टन : सलामीवीर लोकेश राहुलच्या (१५८) आकर्षक शतकी खेळीनंतर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेच्या (१०८*) नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला डाव ९ बाद ५०० धावांवर घोषित करून ३०४ धावांची मजबूत आघाडी घेतली. यानंतर यजमानांची चहापानापर्यंत दुसऱ्या डावात ४ बाद ४८ धावा अशी केविलवाणी अवस्था करून भारताने चौथ्या दिवशी विजयी दिशेने कूच केली. पावसाच्या सततच्या व्यत्ययानंतरही भारताला विंडिजविरुद्ध मोठ्या विजयाची संधी आहे.
विंडिजच्या पहिल्या डावातील १९६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताने रहाणेच्या जोरावर पहिला डाव ९ बाद ५०० धावसंख्येवर घोषित केला. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा अखेरच्या सत्रात खेळ शक्य झाला नाही. पावसाने दुसऱ्यांदा व्यत्यय निर्माण केल्यामुळे तिसऱ्या दिवशी निर्धारित वेळेपूर्वीच चहापानासाठी खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताने घेतलेल्या भल्यामोठ्या आघाडीचा पाठलाग करताना विंडिजने सावध सुरुवात केली. मात्र तिसऱ्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशांत शर्माने राजेंद्र चंद्रिकाचा (१) त्रिफळा उडवताना विंडिजला पहिला धक्का दिला. यानंतर क्रेग ब्रेथवेट (२३) आणि डॅरेन ब्रावो (२०) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, लेगस्पिनर अमित मिश्राने ब्रेथवेटला १३व्या षटकात बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने विंडिजचे कंबरडे मोडताना धोकादायक सॅम्युअल्सला शून्यावर बाद करून चहापानापूर्वी स्थिरावलेल्या ब्रावोलाही बाद केले.
तत्पूर्वी, भारतीय डावात रहाणेची शतकी खेळी तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. रहाणेचे कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. विंडिजच्या गोलंदाजांनीही सलग दुसऱ्या दिवशी अचूक मारा करीत भारतीय फलंदाजांना नैसर्गिक फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)
>धावफलक
वेस्ट इंडिज पहिला डाव १९६.
भारत पहिला डाव :- राहुल झे. डाऊरिच गो. गॅब्रियल १५८, धवन झे. ब्राव्हो गो. चेज २७, पुजारा धावबाद ४६, कोहली झे. चंद्रिका गो. चेज ४४, रहाणे नाबाद १०८, अश्विन पायचित गो. बिशू ०३, साहा पायचित गो. होल्डर ४७, अमित मिश्रा झे. चंद्रिका गो. चेज २१, शमी त्रि. गो. चेज ००, यादव झे. होल्डर गो. चेज १९. अवांतर (२७). एकूण १७१.१ षटकांत ९ बाद ५०० (घोषित). गोलंदाजी : गॅब्रियल ६२/१, कमिन्स ८७/०, होल्डर ७२/१, चेज १२१/५, बिशू १०७/१, वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : क्रेग ब्रेथवेट झे. राहुल गो. मिश्रा २३, राजेंद्र चंद्रिका त्रि. गो. इशांत १, डॅरेन ब्रावो झे. राहुल गो. शमी २०, मार्लन सॅम्युअल्स त्रि. गो. शमी ०, जे. ब्लॅकवूड खेळत आहे ३. अवांतर : (१). एकूण : १५.५ षटकांत ४ बाद ४८ धावा. गोलंदाजी : मोहम्मद शमी २५/२, मिश्रा ४/१, इशांत १९/१.

Web Title: India on the path of victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.