भारत-पाकिस्तान भिडणार?
By Admin | Updated: November 10, 2015 23:23 IST2015-11-10T23:23:46+5:302015-11-10T23:23:46+5:30
यंदाच्या डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पाच वन-डे व दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या आयोजनाची शक्यता आहे

भारत-पाकिस्तान भिडणार?
नवी दिल्ली : यंदाच्या डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पाच वन-डे व दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या आयोजनाची शक्यता आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) स्पष्ट करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सरकारसोबत चर्चा सुरू केली असून दिवाळीनंतर यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर मालिकेच्या मंजुरीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयासोबत चर्चा करतील. एक सिनिअर पदाधिकारी म्हणाला, ‘आम्ही क्रिकेट संबंध सुरळीत करण्यास इच्छुक आहोत. क्रिकेट संबंधामध्ये राजकारण आडकाठी ठरू नये, असे आमचे वैयक्तिक मत आहे. आम्ही पाच वन-डे व दोन टी-२० सामने किंवा तीन वन-डे व दोन टी-२० सामने खेळू शकतो. राजकीय पक्षांचा विरोध होणार नाही, अशा प्रदेशात हे सामने आयोजित करण्यात येईल.’
आयसीसीच्या दौरा कार्यक्रमानुसार पाकिस्तानला भारताचे यजमानपद भूषवायचे आहे, पण शिवसेनेच्या विरोधामुळे या मुद्यावर मनोहर व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख शहरयार खान यांच्यादरम्यान मुंबई येथे होणारी चर्चा रद्द करण्यात आली होती.
उभय संघांदरम्यान २००७ पासून मालिका झालेली नाही. दरम्यान डिसेंबर २०१२ मध्ये पाकिस्तान संघ छोट्या मालिकेसाटी भारत दौऱ्यावर आला होता.
बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सोमवारी वार्षिक आमसभेनंतर पत्रकारांना सांगितले की, ‘डिसेंबरमध्ये होणारी प्रस्तावित मालिका पूर्णपणे रद्द झालेली नाही, पण मालिकेबाबतचा अंतिम निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. मालिकेचा निर्णय सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे.’ (वृत्तसंस्था)
‘बीसीसीआयची वाटचाल
अस्थिरतेकडून स्थायित्वाकडे’
मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डात काही काळापासून अनेक चढउतार आले. या अस्थिरतेतून स्थायित्वाकडे वाटचाल करण्यासाठीच काही कठोर निर्णय घेण्यात आले. या निर्णयांना पाठिंबा देण्याचे आवाहन नवे अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर यांनी सर्व सदस्यांना केले. बोर्डाची स्वायत्तता कायम राखण्यासाठी कठोर निर्णय आवश्यक असल्याचे समर्थन करीत ८६ व्या वार्षिक आमसभेतील अहवालात मनोहर म्हणतात, ‘‘अध्यक्ष या नात्याने माझी दुसरी टर्म अधिक आव्हानात्मक आहे. बोर्डाची वाटचाल सध्या अस्थिरतेकडून स्थायित्वाच्या दिशेने सुरू असल्यामुळे स्वायत्तता टिकविण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. या निर्णयांना आपला पाठिंबा हवा आहे.’
२०१३ च्या स्पॉट फिक्सिंगचा उल्लेख करीत मनोहर म्हणाले, ‘बीसीसीआय अनेक संकटांचा सामना करीत आहे. बीसीसीआयला कामकाजात पारदर्शीपणा जोपासण्याची गरज आहे. बोर्डाचा पैसा खर्च करण्याचा अधिकार आपला असेल, तर त्याचा हिशेब देण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.
पारदर्शीपणा आणण्यासाठी मी नियम तसेच दिशानिर्देशांशी संबंधित सर्व माहिती वेबसाईटवर टाकली हे पहिले पाऊल आहे. काही नियमात बदल, दुहेरी भूमिकेबाबतचे नियम तयार करणे तसेच खेळाडूंच्या मॅनेजर्ससाठी अॅक्रिडेशन तयार करण्यास आपला पाठिंबा हवा. क्रिकेट हा सर्व स्तरावर भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपापल्या राज्यात सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्याची आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. यामुळे क्रिकेट चाहत्यांचा या खेळावरील विश्वास वाढेल, याची मला खात्री आहे.’
डिसेंबरमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी आम्ही करारबद्ध आहोत, पण पाकिस्तान किंवा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात उत्तर भारतात मालिका आयोजित करण्याबाबत विचार करीत आहोत. पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी सरकारकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सरकारच्या निर्णयाचे आम्ही पालन करू.
- शशांक मनोहर, बीसीसीआय अध्यक्ष
बीसीसीआयकडून अद्याप प्रस्ताव नाही : राजनाथसिंह
भारत-पाक संघांदरम्यान डिसेंबरमध्ये प्रस्तावित मालिका आयोजनाबाबत अद्याप बीसीसीआयतर्फे गृहमंत्रालयाला कुठला प्रस्ताव मिळालेला नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
पत्रकारांसोबत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, ‘‘अद्याप गृह मंत्रालयाला या मालिकेबाबत बीसीसीआयकडून कुठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. भारत पाकिस्तानसोबत सलोख्याचे संबंध स्थापित करण्यास इच्छुक आहे, पण पाकिस्तानतर्फेही त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे.’’
बीसीसीआयने सोमवारी म्हटले होते, की डिसेंबरमध्ये प्रस्तावित
भारत-पाक क्रिकेट मालिकेसाठी बोर्डाची तयारी आहे, पण यासाठी अंतिम निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटले होते, की मालिकेचा निर्णय सरकारवर अवलंबून आहे
सीमेवर शांततेशिवाय मालिका अशक्य
नवी दिल्ली : सीमेवरील तणाव संपल्याशिवाय भारत-पाक क्रिकेट शक्य नसल्याचे मत माजी क्रिकेटपटू आणि भाजप खा. कीर्ती आझाद यांनी मंगळवारी व्यक्त केले.
सीमेवर शांतता प्रस्थापित होईस्तोवर दहशतवादावर चर्चा होऊ शकत नाही, याची जाणीव बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना असल्याचे सांगून आझाद पुढे म्हणाले, ‘पाकसोबत द्विपक्षीय मालिकेचे आयोजन शक्य होईल, असे मला वाटत नाही. सीमेवर वारंवार
तणाव निर्माण होत असल्याने
आधी त्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे.’
शिवसेना कार्यकर्त्यांनी राडा केल्याने मुंबईत भारत-पाक क्रिकेट अधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकली नव्हती. यावर मांडताना आझाद म्हणाले, ‘विरोध हा कायमस्वरूपी तोडगा नव्हे. पण काही मुद्यांकडे
दुर्लक्ष किंवा डोळेझाक करता
येणार नाही.’ बीसीसीआय
अध्यक्ष शशांक मनोहर यांचे त्यांनी कौतुक केले.
मनोहर हे बीसीसीआयला पारदर्शी बनवित असल्याबद्दल मी आनंदी असल्याचे आझाद यांनी सांगितले. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार भारत-पाक यांच्यात २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका व्हायच्या आहेत. पण २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकसोबतचे क्रिकेट संबंध स्थगित केले आहेत. (वृत्तसंस्था)