भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार
By Admin | Updated: November 18, 2016 00:01 IST2016-11-18T00:01:19+5:302016-11-18T00:01:19+5:30
भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्र्ध्यांमधील क्रिकेट संबंध ताणले गेले असताना, महिला आशिया चषक स्पर्धेत मात्र दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार
कराची : भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्र्ध्यांमधील क्रिकेट संबंध ताणले गेले असताना, महिला आशिया चषक स्पर्धेत मात्र दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत. २५ नोव्हेंबरपासून थायलंड येथे होणाऱ्या टी-२० महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारताने सहमती दिली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, ‘‘दोन्ही देशांमधील राजकीय तणाव पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह (आयसीसी) चर्चा करू, की कोणत्याही स्पर्धेत भारत-पाकिस्तान साखळी सामन्याचे आयोजन करू नये.’’ ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर आशिया चषक स्पर्धेतील या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग पसरले होते.
मात्र, आता पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-पाक सामना होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी माहिती दिली, की केपटाऊन येथे झालेल्या मागच्या आयसीसी बैठकीत आम्ही हा मुद्दा गांभीर्याने उचलला होता आणि भारताने सांगितले, की त्यांना द्विपक्षीय मालिकेत आमच्यासह खेळण्यास अडचण होती. परंतु, आयसीसी स्पर्धेमध्ये मात्र ते आमच्याविरुद्ध खेळतील.
तसेच, पाकिस्तानी दलाचे प्रमुख नजीम सेठी यांनी भारत-पाक संबंधावर ठाकूर यांनी केलेल्या वक्त्यव्याची प्रसारमाध्यमांतील
कात्रणं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सोपविली असल्याची माहितीही सूत्रांनी या वेळी दिली. (वृत्तसंस्था)