भारताला क्लीन स्वीपची संधी
By Admin | Updated: October 8, 2016 03:36 IST2016-10-08T03:36:31+5:302016-10-08T03:36:31+5:30
शनिवारपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत पुन्हा एक ‘क्लीन स्वीप’ नोंदवण्यास उत्सुक आहे.

भारताला क्लीन स्वीपची संधी
इंदूर : मालिका जिंकून आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान निश्चित करणारा भारतीय संघ आज, शनिवारपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत पुन्हा एक ‘क्लीन स्वीप’ नोंदवण्यास उत्सुक आहे. भारताने आॅस्ट्रेलियाचा २०१२-१३ मध्ये पराभव केल्यानंतर, पुढच्या मोसमात विंडीजचा सफाया केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेल्या मोसमात या कामगिरीची पुनरावृत्ती केली. गेल्या काही मोसमातील भारतीय संघाची मायदेशातील कामगिरी बघता शनिवारपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटीत यजमानांना विजयाचा दावेदार मानला जात आहे. क्रिकेटचा इतिहास जुळलेल्या या शहरात प्रथमच कसोटी क्रिकेट खेळले जाणार आहे.
भारतात विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेला पाहुणा न्यूझीलंड संघ कर्णधार विलयम्सन फिट व्हावा, यासाठी प्रार्थना करीत असेल. आजारपणामुळे विल्यम्सनला दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. विल्यम्सनने गुरुवारी नेटमध्ये फलंदाजी केली आणि गोलंदाजी प्रशिक्षक जर्गेसेन यांनी हे शुभसंकेत असल्याचे म्हटले होते. विल्यम्सनने कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात आर. आश्विन व रवींद्र जडेजा या फिरीकपटूंना धैर्याने तोंड दिले होते. त्याने त्या लढतीत ७५ व २५ धावा फटकावल्या होत्या. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत किवी संघ कोलकातामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात २०४ व १९७ धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज विशेष फॉर्मात नसल्यामुळे विल्यम्सनचे पुनरागमन संघासाठी आवश्यक आहे.
न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. फलंदाजीमध्ये टॉम लॅथम व ल्युक रोंची यांनी प्रयत्न केला, पण उर्वरित फलंदाजांकडूनही त्यांना साथ मिळणे अपेक्षित आहे. भारताला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची उणीव भासणार आहे. पाठदुखीमुळे भुवनेश्वर या कसोटीला मुकणार आहे. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात पाच बळी घेतले होते. मोहंमद शमीच्या जोडीला पहिल्या सामन्यात खेळणाऱ्या उमेश यादवच्या पुनरागमनाची आशा आहे.
किवी फलंदाजांपुढे आश्विनचे गोलंदाजी खेळण्याचे मोठे आव्हान राहील. आश्विनच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. या व्यतिरिक्त जडेजाचा फिरकी माराही पाहुण्यांसाठी अडचणीचा ठरला आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंडची भिस्त वेगवान माऱ्यावर आहे. ट्रेंट बोल्ट व मॅट हेन्रीकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर
पुजारा फॉर्मात असून, कोलकातामध्ये
रोहित शर्माने दुसऱ्या डावात शानदार
खेळी केली होती. गौतम गंभीरला दोन
वर्षांनंतर कसोटी खेळण्याची संधी
मिळणार आहे. तो मुरली विजयच्या साथीने डावाची सुरुवात करेल. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिद्धिमान साहाने कोलकातामध्ये दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली होती.
आश्विन व जडेजा यांनीही चांगली फलंदाजी केली होती. त्यावरून भारतीय संघाची फलंदाजी बळकट असल्याचे
सिद्ध होते. दरम्यान, या लढतीत वातावरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसे बघत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली
नाही. गेले दोन दिवस येथे तुरळक
पाऊस पडला. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेला सामन्याच्या यशस्वी आयोजनाचा विश्वास आहे. (वृत्तसंस्था)
>कर्णधार म्हणून सत्रांवर नियंत्रण राखणे आत्मसात केले : कोहली
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली शिकण्यासाठी प्रयत्नशील असतो. संघासाठी अनुकूल नसलेल्या सत्रांवर नियंत्रण मिळविण्याचे कौशल्य आत्मसात केले असल्याचे कोहलीने सांगितले.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहली म्हणाला, ‘‘कसोटी सामन्यात प्रत्येक सत्रावर नियंत्रण राखणे महत्त्वाचे ठरते. भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली असली, तरी तिसऱ्या कसोटी सामन्यात कामचलाऊ सलामीवीराला संधी न देता अनुभवी गौतम गंभीरला खेळवणार आहे.’’
कोहलीने संघात पुनरागमन करणारा गोलंदाज मोहंमद शमीची प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘‘शमीने चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली आहे. तो कुठल्याही खेळपट्टीवर बळी घेण्यास सक्षम आहे. कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो महत्त्वाचा गोलंदाज आहे.’’
होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत कोहली म्हणाला, ‘‘इंदूरमध्ये प्रथमच कसोटी सामना होत आहे. स्टेडियम शानदार असून खेळपट्टी चांगली भासत आहे. वातावरणाबाबत साशंकता आहे; पण त्यावर आपले नियंत्रण नसते. खेळपट्टी चांगली भासत असल्यामुळे लढत चांगली होण्याची आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)
>प्रतिस्पर्धी संघ
भारत :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, गौतम गंभीर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, मोहंमद शमी, अमित मिश्रा, आर. अश्विन, उमेश यादव, जयंत यादव, शार्दूल ठाकूर आणि करुण नायर.
न्यूझीलंड : - केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रासवेल, जीतन पटेल, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जेम्स नीशाम, हेन्री, निकोल्स, ल्युक रोंची, मिशेल सँटनर, ईश सोढी, रॉस टेलर, नील वॅगनर, बी.जे. वॉटलिंग.