भारताची पराभवाची मालिका सुरुच, सराव सामन्यातही पराभूत

By Admin | Updated: February 8, 2015 16:51 IST2015-02-08T16:51:06+5:302015-02-08T16:51:06+5:30

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला.

India lost the series of defeats, practice match | भारताची पराभवाची मालिका सुरुच, सराव सामन्यातही पराभूत

भारताची पराभवाची मालिका सुरुच, सराव सामन्यातही पराभूत

 ऑनलाइन लोकमत 

अॅडिलेड, दि. ८ - ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

विश्वचषकापूर्वी रविवारी अॅडिलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना रंगला. या सामन्याला अधिकृत दर्जा नसला तरी भारताच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. कसोटी मालिका व त्यानंतरच्या तिरंग मालिकेतील कटू आठवणी विसरुन विश्वचषकापूर्वी विजय मिळवून मनोबल वाढवण्याची संधी भारतीय संघाकडे होती. मात्र या सामन्यात भारताचे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजांच्या निष्प्रभ मा-यामुळे ऑस्ट्रेलियाने ४८.२ षटकांत सर्व गडी गमावत ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय फलंदाजही निराशाजनक कामगिरी करुन माघारी परतले.सलामीवीर रोहित शर्मा आणि तिस-या क्रमांकावर आलेला विराट कोहली अनुक्रमे ८ आणि १८ धावांवर बाद होऊन माघारी परतले. यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत भारताला १५० टप्पा ओलांडून दिला. भारताच्या १५७ धावा झाल्या असताना रहाणे (६६ धावा) बाद झाला. त्यानंतर १७२ धावांवर असताना धवन ५९ धावांवर बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी करत विकेट गमावल्या. रैना ९ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. तर महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीही ५ धावांवर बाद झाला. अंबाटी रायडू (५३धावा) आणि रविंद्र जडेजा (२० धावा) या जोडीने भारताला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. अक्षर पटेव व आर. अश्विनही स्वस्तात बाद झाले. 

 

धोनीची डोकेदुखी वाढली

विश्वचषकापूर्वीच्या या सामन्यात भारताला एक चांगली संधी होती. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजूंमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी झाली. विराट कोहलीला अद्याप सूर सापडलेला नाही. तर गोलंदाजही सपशेल अपयशी ठरले आहेत. आता भारताचा आगामी सराव सामना अफगाणिस्तानसारख्या लिंबू टिंबू संघासोबत होणार आहे. विश्वचषकात भारताची सलामीची लढत पाकसोबत आहे. यासामन्यापूर्वी सर्वोत्तम ११ जणांचा अंतिम संघ निवडताना धोनीची दमछाक होईल असे दिसते. 

 

 

Web Title: India lost the series of defeats, practice match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.