भारत ‘अ’ ११९ धावांनी पराभूत

By Admin | Updated: August 7, 2015 22:33 IST2015-08-07T22:33:53+5:302015-08-07T22:33:53+5:30

जो बर्न्स आणि कर्णधार उस्मान ख्वाजा या सलामी जोडीने द्विशतकी भागीदारी केल्यामुळे आॅस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी भारतीय अ संघाचा वन डे तिरंगी मालिकेत ११९ धावांनी पराभव केला

India 'A' lost by 11 runs | भारत ‘अ’ ११९ धावांनी पराभूत

भारत ‘अ’ ११९ धावांनी पराभूत

चेन्नई : जो बर्न्स आणि कर्णधार उस्मान ख्वाजा या सलामी जोडीने द्विशतकी भागीदारी केल्यामुळे आॅस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी भारतीय अ संघाचा वन डे तिरंगी मालिकेत ११९ धावांनी पराभव केला. बर्न्सने फटकेबाजीचा शानदार नमुना सादर करीत १४ षटकारांसह १५४ धावा ठोकल्या. २५ वर्षांच्या या फलंदाजाने १३१ चेंडू टोलविले. कारकिर्दीत ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली.
ख्वाजाने देखील १०४ धावांचे योगदान देत सलामीला २३९ धावांची भागीदारी करताच आॅस्ट्रेलिया अ ने ५० षटकांत ४ बाद ३३४ धावा उभारल्या. मोठ्या लक्ष्यापुढे सुरुवातीपासून दडपणात वावरणाऱ्या भारत अ चा डाव ४२.३ षटकांत २१५ धावांत आटोपला. कर्णधार उन्मुक्त चंद ५२, केदार जाधव ५० यांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे पराभवाचे अंतर काही अंशी कमी होऊ शकले. आॅस्ट्रेलियाकडून मध्यम जलद गोलंदाज गुरिंदरसिंग संधू याने २८ धावांत चार आणि लेगस्पिनर अ‍ॅडम जांपा याने ४९ धावा देत चार गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाचा स्पर्धेत हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी द. आफ्रिका अ संघाचा नऊ गड्यांनी पराभव केला होता. भारत अ वर विजय मिळविल्यानंतर त्यांचे दहा गुण झाले. भारत अ आणि द. आफ्रिका अ हा सामना ९ आॅगस्ट रोजी खेळला जाईल.
भारतीय अ संघाचे आघाडीचे फलंदाज स्थिरावून खेळण्यात अपयशी ठरले. मयंक अग्रवाल १०, मनीष पांडे ११ आणि करुण नायर ६ हे बाद होताच ३ बाद ६७ धावा झाल्या. उन्मुक्तने एक टोक सांभाळले. पण अर्धशतक होताच त्याचीही दांडी गूल झाली. झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकविणाऱ्या केदार जाधवकडून आशा होत्या पण तो मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरताच भारताच्या आशा मावळल्या. संजू सॅमसन ११ आणि अक्षर पटेल १६ यांच्यापाठोपाठ जाधव देखील अर्धशतकानंतर झेलबाद झाला. परवेझ रसूल १० आणि कर्ण शर्मा २० तसेच धवल कुलकर्णी १९ यांनी दुहेरी आकडा गाठला पण संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. त्याआधी बर्न्स आणि ख्वाजा यांनी भारतीय मारा मनसोक्त फोडून काढला. दोघांनीही मिळालेल्या जीवदानाचा लाभ उचलला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत सामन्यात परतण्याचे प्रयत्न केले. (वृत्तसंस्था)

Web Title: India 'A' lost by 11 runs